रत्नागिरी : कोरोनामुळे अनेक मुंबईकर गावाकडे आले असून, काहीजण शेतीकडे वळले आहेत. त्यामुळे पडीक क्षेत्रही लागवडीखाली आले आहे. सलग दुसऱ्या वर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (एमआरईजीएस) फळबाग लागवडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात एक हजार २२९.१६ हेक्टरवर आंबा, काजूची लागवड करण्यात आली आहे.
रत्नागिरी फलोत्पादन जिल्हा म्हणून घोषित झालेला आहे. त्यानुसार स्थानिक फळझाडांच्या लागवडीला चालना दिली जात आहे. दहा वर्षांपूवी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. एमआरईजीएसमधून दहा हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा, काजूच्या लागवडीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले, त्यामध्ये यशही मिळाले आहे. गेल्या दहा वर्षांत १५ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे.
गतवर्षी कोरोनामुळे व्यवहार कोलमडले होते. त्यामुळे अनेक मुंबईकर गावाकडे परतले होते. घरी बसून काम नसल्यामुळे पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. काहींनी भातशेती केली तर अनेकांनी फळ लागवडीला प्राधान्य दिले. डोंगर, माळरानावर आंबा, काजू लागवडीला प्रारंभ केला.
गतवर्षी जिल्हा कृषी अधीक्षक विभागाकडून दोन हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. त्यात काजू लागवडीचे प्रमाण अधिक होते. यावर्षी फळ लागवडीकडे लोकांचा कल असून, आतापर्यंत एक हजार २२९ हेक्टरवर लागवड झाली आहे. अद्याप भात लागवडीची कामे सुरू असल्यामुळे फळझाड लागवड काहींनी सुरू केलेली नसली तरी भातशेती लागवडीनंतर रोपांची लागवड मात्र केली जाणार आहे. त्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत यावर्षी लागवडीखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनीही एमआरईजीएस अंतर्गत येणाऱ्या कामांवर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन केले आहे. तालुकास्तरावर होत असलेल्या बैठकांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधत लागवडीचे आवाहन करण्यात येत आहे.
-----------------------
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (एमआरईजीएस) गावातल्या गावात रोजगार मिळवून देण्यासाठी फळबाग लागवडीचे आवाहन करण्यात आले आहे. फळबाग लागवडीच्या कामांना चालना देण्यासाठी तालुकानिहाय सूचना करण्यात आल्या आहेत. जॉबकार्डही काढून घेण्याचे काम सुरू आहे. पंचायत समिती स्तरावर तर सातत्याने आढावा घेण्यात येत आहे.
- उर्मिला चिखले, प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक, रत्नागिरी
---------------------
तालुकानिहाय लागवड केलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे :
तालुका लागवडीखालील क्षेत्र
मंडणगड १२३.२०, दापोली २०१.३०, खेड ३४४.४५, चिपळूण ८२.३०, गुहागर १३३.३८, संगमेश्वर ५८.७०, रत्नागिरी १०८.९६, लांजा ९८.८७, राजापूर ७८.००.