रत्नागिरी : दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याच्या निर्णयामुळे प्रवेशाबाबत संकट निर्माण झाले आहे. राष्ट्रीय स्तरावरील किमान १५ संस्थांमधील प्रवेशाची संधी गमावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दहावी, बारावीचा निकाल हाती येईपर्यंत राष्ट्रीयस्तरावरील प्रक्रिया संपेल का, याबाबतची चिंता विद्यार्थी, पालकांमध्ये निर्माण झाली आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक एप्रिल-मे मध्ये निश्चित करण्यात आले होते. वेळापत्रक जाहीर झाले, बारावीचे हॉलतिकीटही विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. लांबलेल्या परीक्षेमुळे कित्येक विद्यार्थ्यांना पुढील क्षेत्र निवडण्यासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय पातळीवर जेईई, नीट अशा विविध परीक्षांच्या प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित आहे. मात्र, राज्य मंडळाच्या परीक्षा लांबल्याने निकालास ऑगस्ट उजाडण्याची शक्यता आहे. त्यानंतर गुणपत्रिका, कागदपत्रांची जुळवाजुळव त्यासाठी लागणारा विलंब. त्यात मे-जूनचे वेळापत्रकही निश्चित असेल की, नाही याची खात्री नाही. अशावेळी राष्ट्रीय पातळीवरील संधीचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एनडीए परीक्षा १८ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. जेईई तिसरी फेरी २७ ते ३० एप्रिल, चौथी फेरी २४ ते २८ मे दरम्यान होणार आहे. १ ऑगस्ट रोजी नीट, ३ जुलै रोजी जेईई अॅॅडव्हान्स, क्लॅट १३ जून, भारताबाहेरील महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ‘एस.एटी’ परीक्षा ८ जून, एसएससी-सीजीएल २९ मे ते ७ जून, बीटस पिलानी २४ ते ३० जून दरम्यान होणार आहेत. बारावीची परीक्षा मेच्या शेवटच्या आठवड्यात तर दहावीची जूनच्या शेवटपर्यंत चालणार आहेत. त्यानंतर प्रात्यक्षिक, त्यानंतर निकाल लागणार आहेत. त्यामुळे निकालाला ऑगस्ट उजाडण्याची शक्यता आहे.