अडरे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचार बंदी घातली आहे. त्यामुळे सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. त्याचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्या रस्त्यावरील छाेट्या-माेठ्या व्यावसायिकांना बसत आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचे काय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
हातगाडीवरील विक्रेते, बांगडीवाले, वडापावाले, पानटपऱ्या, चन्ने शेंगदाणे-चिरमुरेवाले, रस विक्रेते रस्त्यावरील भाजी, काजू, कैऱ्या विकणाऱ्या महिला, चप्पल, बुटपाॅलिश, खेळणी, बांगड्या, कपडे, माठ या विक्रेत्यांनी जगायचे कसे, असा उद्विग्न प्रश्न विचारला जात आहे. शहरातील भोगाळे, चिंचनाका, पानगल्ली, बसस्थानक परिसरात अनेक व्यावसायिक रस्त्याकडेला बसून व्यवसायक करतात. त्यावर संसाराचा गाडा हाकत असतात. मात्र, पुन्हा लाॅकडाऊन झाल्याने अत्यावशयक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. त्यामुळे बाजारात वर्दळ कमी झाली. कडक निर्बंधाचा सर्वात जास्त फटका हातावर पोट असणाऱ्या लोकांना बसला आहे. त्याचबरोबर हाॅटेल, कापड दुकान, वडापावची गाडी चालविणारे विक्रेते यांच्यासमाेर जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांच्यासमोरही उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न पडला आहे.
.............................
उत्पन्नाचे दारे बंद झाल्याने जगण्यासाठी आवश्यक पैसे आणायचे कुठून व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा. त्यामुळे सरकारने आमच्या रोजी-रोटीचा प्रश्न सोडवावा.
- अमजद अन्सारी
..................................
शहरातील भोगाळे परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावर पान, सुपारीचा व्यवसायात करीत आहेत. कोरोनाचा वेग वाढत आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. मात्र, याच व्यवसायावर उदरनिर्वाह चालवीत असल्याने सरकारने मदत करावी.
- संदीप गुरव