देव्हारे : गंजलेले खांब बदलण्याकडे महावितरणचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने वायरमनना बिकट अवस्थेत काम करावे लागत आहे. मंडणगड तालुक्यात धोकादायक पोल उभे असून, त्यावर चढून काम करणे अवघड होत आहे. दापोली येथे पोलवरून पडून एका वायरमनला आपला जीव गमवावा लागला असतानाच या गंभीर विषयाकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आाली आहे.मंडणगड तालुक्यातील ग्रामीण भागात गंजलेल्या विद्युत पोलचे प्रमाण अधिक आहे. अशा पोलवर महावितरणचे कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करतात. पावसाळ्यात गंजलेले खांब पडण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा परिस्थितीत खांबांवर चढून दुरूस्ती करावी लागते. मात्र, या गोष्टीकडे अधिकारी दुर्लक्ष करतात की काय, असा शंका व्यक्त केली जात आहे. पुरेशा उंचीची शिडी नसल्याने पावसाळ्यात खांबांवर चढण्यासाठी त्यांना दोन दोन शिड्या बांधाव्या लागतात. अपुरे कर्मचारी व साधनांची कमतरता यामधे महावितरण कंपनीचे कर्मचारी दबून गेले आहेत. कर्मचारीवर्गाची होणारी परवड व सडलेल्या लोखंडी खांबांमुळे त्यांच्या जीवितास होऊ शकणारा धोका लक्षात घेऊन महावितरण कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांकडे सुरक्षेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. महावितरणच्या अनेक अधिकाऱ्यांकडे ही गोष्ट वेळेवेळी मांडण्यात आली. मात्र, त्याकडे लक्ष दिले जात नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. वीज विकासाचे माध्यम असले तरीही वायरमनच्या सुरक्षिततेकडे लक्ष दिले जात नसल्याबद्दल खंत व्यक्त होत आहे. जिल्ह्यात गंजलेले विद्युत खांब असून गेल्या काही महिन्यात पोलवरून कोणी कर्मचारी पडल्याचा प्रकार तालुक्यात घडला नसला तरी याबाबत अद्यापही आपल्याला योग्य सुरक्षा पुरविली जात नसल्याचे व एखादा प्रसंग समोर आल्यास महावितरण काय करणार याबाबत वायरमननी नापसंती व्यक्त करण्यात आली. (वार्ताहर)मंडणगड तालुक्यात दुर्घटना घडली नाही पण...देव्हारे परिसरात १० पेक्षा अधिक पोल गंजलेले आहेत.मंडणगड तालुक्यात वीज खांबांचा प्रश्न गेली अनेक वर्षे ऐरणीवर.कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे आवश्यक.वायरमनच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना नसल्याने असुरक्षितता कायम.
मंडणगड तालुक्यातील वायरमनचे प्रश्न अद्याप प्रलंबितच
By admin | Published: August 25, 2014 9:33 PM