राबाला पर्यायी पध्दत
राब न भाजताच जोमदार रोपे तयार करण्याची गादीवाफा पध्दत फार उत्तम आहे. तण नियंत्रणासाठी अलीकडे तणनाशकांचा वापरही परिणामकारक करण्याचे किफायतशीर तंत्र विकसित करण्यात आले आहे.
रोपवाटिकेमधील तण नियंत्रण
भात रोपवाटिकेमध्ये पाखड, धूर, बार्डी, लव्हाळा इत्यादी एकदल तर माका, हजारदाणी, कडुनिंब, जलमुखी इत्यादी रुंद पानांची व्दिदल तणे आढळतात. खरीप हंगामातील पोषक तापमान आणि आर्द्रता यामुळे तणांची वाढ जोमदार होते. तणे भाताच्या रोपांबरोबर पाणी, प्रकाश, अन्नद्रव्य व जागेसाठी स्पर्धा करतात. त्यामुळे भाताच्या रोपाची वाढ खुंटते. प्रतिकूल परिस्थितीत ही तणे जोमाने वाढतात. त्यामुळे गरजेनुसार १२ ते १५ दिवसांनी निंदणी करून रोपवाटिका तणमुक्त ठेवावी किंवा भात रोपवाटिकेतील तणांचे नियंत्रण करण्यासाठी काही तणनाशके प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. त्यासाठी ऑक्सीडायरजील (६ इ.सी) ३.३ मिली किंवा ब्युटाक्लोर (५० इ.सी) ५ मिली किंवा पेंडीमेथॅलीन (३० इ.सी) ८.३ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. दहा गुंठे रोपवाटिकेसाठी ६० लिटर औषधांचे द्रावण पुरेसे होते. फवारणीसाठी नॅपसॅक पंप व खास तणनाश फवारणीसाठी नोझलचा वापर करावा.
पाणी व्यवस्थापन
पाऊस नसेल तर बी पेरल्यापासून बी उगवेपर्यत गादीवाफे दोन ते तीन सेंटिमीटर खोल पाण्याने भिजवावेत. रोपांची जोमदार वाढ होण्यासाठी अधूनमधून पाण्याचा निचरा करावा. हळूहळू पाण्याची पातळी पाच सेंटीमीटर पर्यत वाढवावी, त्यामुळे तणांचा बंदोबस्त होईल. मात्र पाऊस पडला तर पाण्याची गरज नाही.
कीड नियंत्रण
भातावर येणाऱ्या महत्त्वाच्या किडी म्हणजे खोडकिडा आणि गादमाशी. या किडींच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर १५ दिवसांनी हेक्टरी १६.५० किलो कार्बोफ्युरान किंवा १० किलो फोरेट किंवा १५ किलो क्विनालफाॅस यापैकी कोणत्याही एका दाणेदार कीटकनाशकांचा वापर करावा. ओलाव्याअभावी प्रवाही कीटकनाशकांची फवारणी करावी.