चिपळूण : माजी खासदार निलेश राणे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर १६ फेब्रुवारीस पोलिसांनी आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयास मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. मात्र तरीही येथे घडलेली घटना फक्त राजकीय राडा इथपर्यंत मर्यादित नसून निलेश राणेंसह भाजप कार्यकर्त्यांवर त्यांना हल्ला करायचाच होता. त्यासाठी कट रचून कार्यकर्त्यांची कुमक जमवली. त्याच्या कार्यालय परिसरात कार्यकर्त्याजवळ लोखंडी शिगा व दगड असल्याचे व्हिडीओ सापडले आहे. जाधवांच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांनी हत्यारे गोळा करीत प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी पत्रकार परिषदेत केला.आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत राणे समर्थकांनी राडा करीत हल्ला केल्याचा आरोप केला होता. त्यावर भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे म्हणाले की, आमदार जाधव यांनी सिंधुदुर्गातील सभेत राणे कुंटुबियांवर व्यक्तीगत टीका केल्यानंतर निलेश राणेंनी गुहागरात जाहीर सभा घेण्याचे जाहीर केले होते. राणेंचे चिपळूणात कोठे स्वागत होईल याची माहिती व ठिकाण पोलिसांना सांगितले होते. राणेंच्या दौऱ्यानिमीत्ताने जाधवांच्या संपर्क कार्यालयास पोलिस संरक्षण होते. तरीही आमदार जाधव यांनी कार्यकर्त्यांना बोलावून घेत जमा करीत शक्तीप्रदर्शन केले. राणेंची मिरवणूक सुरू झाल्यानंतर जाधवांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मागे उभे राहून दगडफेक केली. त्यांच्या कार्यालय आवारात लोखंडी शिगा व दगड असलेले व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. कार्यालयाच्या आवारात हत्यारे गोळा करण्याचा हेतू काय, याची वरिष्ठ स्तरावून चौकशी करण्याची मागणी आम्ही केलेली आहे. गुहागर मतदार संघातून आमदार जाधवांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांनी निलेश राणेंवर हल्ला करण्याचा कट रचला. हा कट पुर्व नियोजीत होती. जाधवांच्या कार्यालय आवारातील इमारतींच्या टेरेसवर देखील दगडाचा साठा होता.मिरवणूकी दरम्यान संघर्ष निर्माण होण्यासाठी आमदार जाधव हे त्यांच्या कार्यकर्त्याना चिथावणी देत होते. त्यांचे हावभाव आणि हालचाली देखील चित्रीकरणात दिसतात. त्यामुळे १६ रोजी झालेल्या या हल्ल्याच्या मुळाशी जाऊन तपास करण्याची मागणी आम्ही ग्रहमंत्र्यांकडे केली आहे, असे साठे यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी माजी नगरसेवक विजय चितळे, परिमल भोसले, तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर आदी उपस्थित होते.
हत्यारे गोळा करण्याचा हेतू काय? चिपळुणातील राडा प्रकरणी चौकशी करा; भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांचा आरोप
By संदीप बांद्रे | Published: February 20, 2024 5:48 PM