चिपळूण : शहरातील बाजारपेठेत जुना स्टॅण्ड परिसरात अलिशान चारचाकी गाडीतून येवून चौघांनी चिपळुणातील एका व्यापाऱ्याला दुकानातून बाहेर बोलवून भर रस्त्यात मारहाण करायला सुरुवात केली. हा प्रकार समजल्यानंतर व्यापाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून त्या चौघांनी बेदम धुलाई करुन गाडीची तोडफोड केली. यामध्ये तिघे जण जखमी झाले आहेत.
या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. या प्रकरणातील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मारहाणीेचे कारण समजू शकलेले नाही.घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार अमित अनंत शिर्के, राकेश चव्हाण, प्रविण वासुदेव घुळे, किरण चव्हाण हे चौघेजण पांढऱ्या रंगाच्या अलिशान चारचाकी गाडीतून (क्र. एम एच ११ ए डब्ल्यु ८२१८) बाजारपेठेत आले. स्वामी कॉम्प्लेक्सच्या बाहेर फळविक्रीचा व्यवसाय करणारे नयन पिसे यांना त्यांनी दुकानातून बाहेर बोलवून घेतले.नयन रस्त्यावर आल्यानंतर त्याला चौघांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याचे वडिल शिवाजी पिसे सोडविण्यासाठी गेल्यानंतर त्यांनाही मारहाण करायला सुरुवात केली. त्यांच्या दुकानाचीही नासधूस केली.
हा प्रकार समजल्यानंतर शहरातील व्यापारी घटनास्थळी धावून आले. त्यांनी चौघांची धुलाई केली. त्यांच्याकडे मारामारीसाठी वापरणारे प्लास्टिक रॉड सापडले. जमलेल्या जमावाने गाडीच्या काचा फोडून गाडीची नासधूस केली.या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ सहकाऱ्यांना घेवून घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर जमाव बाजूला झाला. जखमी अनंत शिर्के, राकेश चव्हाण व वासुदेव घुळे यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
किरण चव्हाण तेथून पसार झाला. पोलिसांनी मारामारीसाठी वापरलेले रॉड व गाडी जप्त केल्यानंतर दोन्ही बाजूचे लोक फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.