आॅनलाईन लोकमत आवाशी (जि. रत्नागिरी), दि. ८ : युवा सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने गावात वृक्षलागवडीचा कार्यक्रम केला. या रागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्याला ग्रामपंचायतीमध्ये बोलावून कोणाच्या परवानगीने तू कार्यक्रम केलास? अशी विचारणा करत मारहाण केल्याची घटना शेल्डी येथे घडली. ग्रामपंचायतीबाहेर झालेल्या या बाचाबाची व मारहाणीनंतर लोटे पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याचे समजते.शेल्डी (ता. खेड) येथील युवासेनेच्या एका पदाधिकाऱ्याने गावातील दहावी - बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या गावातील दोन राजकीय पक्ष आपापल्यापरीने गावात वर्चस्व निर्माण करण्यासाठी विविध लोकोपयोगी कार्यक्रम राबवत असतात. मात्र, एकाच गावात राहूनही राजकीय मतभेद टोकाचे असल्याने काही अनुचित घडू नये म्हणून वयस्क व जुनेजाणते लोक खबरदारी घेत असतात. गावात सलोखा व एकजूट राहावी म्हणून जुनेजाणते ग्रामस्थ प्रयत्नशील असतात. मात्र, दिनांक ४ जुलै रोजी गावातील युवासेना अधिकारीपदी निवड झालेल्या एका पदाधिकाऱ्याने गुणवंतांच्या सत्कार समारंभाचे आयोजन ग्रामपंचायतीत केले होते. या पदाधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार या कार्यक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या त्याने घेतल्या होत्या.मात्र, दिनांक ५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्याने कुणाला विचारुन कार्यक्रम केला, याची विचारणा करण्यासाठी या पदाधिकाऱ्याला ग्रामपंचायत कार्यालयात बोलावले व ‘तू कुणाच्या परवानगीने हा कार्यक्रम केलास’ याची विचारणा केली. यावेळी युवासेना पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत शाब्दीक चकमक होऊन त्याचे रुपांतर मारहाणीत झाले. त्यानंतर हे प्रकरण लोटे पोलिसात गेले. मात्र, गावातीलच प्रकार असल्याने आम्ही तो मिटवू, असे सांगण्यात आले. यावर पोलिसांनी ‘तुम्ही मिटवा आणि उद्या येऊन तसे पोलीस चौकीत कळवा,’ असे सांगितले. मात्र, गुरुवारी सकाळी युवासेनेच्या पदाधिकाऱ्याने कालच्या मारहाणीत आपल्याला जबर मार बसला असून, माझी वैद्यकीय तपासणी करुन मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, असे सांगितले. त्यानुसार लोटे पोलिसांनी त्याला कळंबणी रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले असून, त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
शेल्डी येथे युवासेना-राष्ट्रवादीत राडा
By admin | Published: July 08, 2017 5:56 PM