रत्नागिरी : वादळ आणि पावसाची नाेंद करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच ‘रडार’ बसविण्यात येणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याचे महासंघालक डाॅ. मृत्यूंजय माेहापात्रा यांनी दिली.
इंडियन मेट्राेलाॅजिकल साेसायटी (आयएमएस)तर्फे ‘हवामान शास्त्र आणि हवामान सेवांमधील अलीकडील प्रगती’ या विषयावर तीनदिवसीय ऑनलाईन कार्यशाळा आयाेजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे गुरूवारी (१७ जून) उद्घाटन करण्यात आले. यावेळी बाेलताना डाॅ. माेहापात्रा यांनी ही माहिती दिली.
या कार्यशाळेला पुणे वेधशाळेचे डाॅ. के. एस. हाेसाळीकर आणि डाॅ. जे. आर. कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी डाॅ. माेहापात्रा यांनी सांगितले की, वादळ आणि पावसाची नाेंद करण्यासाठी विविध प्रकारचे अत्याधुनिक तंत्र विकसित करण्यात आले आहे. जगभरातील सॅटेलाईटच्या माध्यमातून माहिती गाेळा करून त्याचे एकत्रिकरण केले जाते. त्यानंतर ती प्रसारीत केली जाते. सध्या मुंबई, वेरावल आणि गाेवा येथे रडार कार्यान्वित आहे. याच धर्तीवर रत्नागिरीतही रडार यंत्रणा बसविण्यात येणार आहे. हे रडार सी - बॅण्डचे असणार आहे. या रडारमुळे तीन ते चार तासातील अंदाज नाेंदविता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात रडार कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती डाॅ. माेहापात्रा यांनी यावेळी दिली.