रत्नागिरी : शनिवारी रात्री विजांच्या कडकडाटात सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळला. घरांवर झाडे, झाडांच्या फांद्या कोसळल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात अडीच लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळला. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे नुकसान अधिक झाले असले तरी जीवितहानी मात्र झालेली नाही. रत्नागिरी तालुक्यातील वेतोशी येथील मिलिंद भिकाजी कांबळे, रमेश गंगाराम रांबाडे, कृष्णा यशवंत माचिवले यांच्या घरांवर झाडे कोसळून अंशत: नुकसान झाले आहे. नेवरे काजिरभाटी येथील अंकुश पेडणेकर यांच्या घरावर माड कोसळल्यामुळे नुकसान झाले. गुहागर तालुक्यातील देवपाट येथील हरिश्चंद्र धोंडू दुर्गाेळी यांच्या मालकीच्या जनावरांच्या गोठ्यावर झाडाची फांदी पडल्याने नुकसान झाले. चिपळूण तालुक्यातील पोलीस गार्डवर झाडाची फांदी कोसळली. चिपळूण येथील वासंती गोविंद पाचकले यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळल्यामुळे १ लाख ८५ हजारांचे नुकसान झाले. पाटपन्हाळे येथे वडाचे झाड रस्त्यावर कोसळल्याने मार्ग बंद झाला होता. परंतु झाड दूर करुन मार्ग पूर्ववत करण्यात आला. चिपळूण तालुक्यातील असुर्डे येथे जयराम खेतले, सूर्यकांत खेतले, अनंत खेतले, कविता मुसडकर, किशोरी सुर्वे, रामजी खेतले यांच्या घरांचे अंशत: नुकसान झाले. पाग येथील हनुमंत कृष्णा गावकर यांच्या घरावर झाड कोसळून घराचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. कापसाळ येथील चंद्रकांत साळवी यांच्या घराचे २० हजारांचे नुकसान झाले आहे. याशिवाय डेरवण, कुडप धनगरवाड्यांमध्ये घरांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)
वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार
By admin | Published: June 05, 2016 10:59 PM