खेड : रत्नागिरी व सातारा जिल्हा यांना जोडणारा व खेड तालुक्यापासून २५ किलोमीटर अंतरावर असणारा रघुवीर घाटात दरड काेसळण्याचे प्रकार घडत आहेत. तर रसाळगड भागात रस्ता गतवर्षी खचला हाेता. त्यामुळे रघुवीर घाट व रसाळगड पर्यटकांसाठी प्रशासनाने १ जुलैपासून पुढील दोन महिन्यांसाठी बंद केला आहे.
तालुक्यातील रघुवीर घाट हा पावसाळ्यामधील मोठे पर्यटन स्थळ आहे. या घाटामध्ये खेड तालुक्यातील तसेच बाहेरील अनेक पर्यटक वर्षा पर्यटनासाठी जुलै महिन्यापासून हजेरी लावतात. या घाटात पावसाळ्यात प्रवाहित होणारे धबधबे, थंड वातावरण व धुक्याची दाट चादर यासारख्या अनेक वैशिष्ट्यांनी पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते.मात्र, या घाटाचा रस्ता हा गेल्यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे खचला असून, त्यामुळे चालत्या वाहनांवर दगड कोसळण्याचे प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनांचा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तसेच काही पर्यटक हे घाटामध्ये मद्यप्राशन करतात, त्यामुळे तिथे पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होऊन भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा घाट बंद ठेवण्यात येणार आहे.
सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेला रसाळगड ही पावसाळी पर्यटनासाठी साहसी पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे. मात्र, घेरा रसाळगड ते रसाळगड किल्ला जोडणारा रस्ता गतवर्षीच्या पावसाळ्यात खचण्याचे प्रकार घडले होते. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव याबाबतचे लेखी आदेश उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांनी संबंधित यंत्रणांना पाठवले आहेत.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी खोऱ्यातील सुमारे वीस ते पंचवीस लहान-मोठी गावे ही भौगोलिक व रस्ता मार्गाने खेड शहर व तालुक्याशी जोडली गेली आहेत. या भागातील ग्रामस्थांना दैनंदिन अत्यावश्यक कारणांसाठी रघुवीर घाटातून प्रवास करण्यास सवलत देण्यात आली आहे. - राजश्री मोरे, उपविभागीय अधिकारी, खेड