रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे-पाटीलवाडी येथे गावठी हातभट्टी तयार करून, सुमारे ३५ हजार रुपयांची दारू व इतर साहित्य बाळगल्याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवार, २२ सप्टेंबर रोजी सकाळी ७.१५ वाजता करण्यात आली.
सुजन सुभाष पाटील (४९, रा.मिरजोळे पाटीलवाडी, रत्नागिरी) आणि सुशांत धोंडू नलावडे (२५, रा.वेतोशी मारगमेवाडी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात पोलीस कॉन्स्टेबल किशोर साळवी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, या दोघांनी संगनमताने मिरजोळे-पाटीलवाडी येथील नदी किनारी बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी तयार करून, विक्रीसाठी आपल्याकडे गावठी हातभट्टीची दारू बाळगली होती.
याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळताच, त्यांनी त्या ठिकाणी बुधवारी सकाळी धाड टाकून गावठी दारू व इतर साहित्य असा एकूण ३४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. अधिक तपास सहायक पोलीस फौजदार भगवान पाटील करत आहेत.