रत्नागिरी : शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या एका लाॅजवर पाेलिसांनी छापा टाकून माेठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी पहाटे करण्यात आली असून, या कारवाईत पाेलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या कारवाईची माहिती रत्नागिरी शहरात पसरताच एकच खळबळ उडाली आहे.जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना आळा बसण्यासाठी पाेलिसांनी विशेष माेहीम हाती घेतली आहे. गेल्या काही महिन्यात पाेलिसांनी जिल्ह्यात अंमली पदार्थांचा साठा जप्त करुन पाळेमुळे खणून काढण्याचा चंग बांधला आहे. अवैध व्यवसायाविराेधात पाेलिसांनी माेहीम उघडली असतानाच शहरातील भरवस्तीत असणाऱ्या एका लाॅजवर अंमली पदार्थाचा माेठ्या प्रमाणात साठा असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती.
त्यानंतर पाेलिसांनी सावध भूमिका घेत मंगळवारी पहाटे या लाॅजवर धाड टाकली. या धाडीत अंमली पदार्थाचा साठा पाेलिसांच्या हाती लागला असून, एकाला ताब्यात घेतले आहे.पाेलिसांच्या अंमली पदार्थ विराेधी पथकाने ही कारवाई केल्याची माहिती पुढे येत आहे. याठिकाणी माेठ्या प्रमाणात अंमली पदार्थ हस्तगत केल्यानंतर श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. पाेलिसांनी घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम हाती घेतले आहे.
हा साठा काेठून आला हाेता, काेणासाठी आला हाेता, त्याची आणखी काेठे विक्री हाेणार हाेती, याची माहिती पाेलीस घेत असून, इतक्या माेठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचा साठा रत्नागिरीत काेणी आणला याचाही पाेलीस शाेध घेत आहेत.दरम्यान, पाेलिसांनी शहरात केलेल्या कारवाईनंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. लाॅजवर झालेल्या कारवाईनंतर व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.