खेड : तालुक्यातील कुळवंडी - लाववाडी येथील जंगलमय भागात नदीकिनारी सुरु असलेली गावठी हातभट्टी उद्ध्वस्त करण्यात खेड पोलिसांना यश मिळाले आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी २,७०,५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अशोक गंगाराम निकम (४८), मनोहर दगडू निकम (४१, दोन्ही रा. कुळवंडी लाववाडी), जितेंद्र विजय निकम व दिनेश (पूर्ण नाव माहीत नाही) तसेच मालक सुरेश रुमाजी निकम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ८ मे रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास कुळवंडी - लाववाडी येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी दारुभट्टीवर धाड टाकून दारू गाळत असताना दोन संशयित आरोपींना रंगेहात पकडण्यात आले तर पळून गेलेल्या अन्य दोघांचा शोध पोलीस घेत आहेत. ही भट्टी सुरेश रुमाजी निकम (रा. कुळवंडी) यांनी लावण्यास सांगितले होते. या धाडीत पोलिसांनी २० हजार रुपये किमतीचे एक पत्र्याचे २ हजार लीटर मापाचे लोखंडी पिंप व त्यामध्ये असलेले ५०० लीटर गरम कुजके गूळ नवसागरमिश्रीत रसायन, १५ हजार रुपये किमतीचा २०० लीटर क्षमतेचा ॲल्युमिनियमचा गोल आकाराचा डेग, १५ हजार रुपये किमतीचे प्लास्टिकचे वेगवेगळ्या रंगाचे ३५ लीटर मापाचे ७ कॅन व त्यामधील ३५ लीटर गावठी हातभट्टीची दारु, १ लाख ९० हजार किमतीच्या ५०० लीटरच्या १७ टाक्यांमधील ९ हजार लीटर कुजके गूळ नवसागरमिश्रीत रसायन, १५ हजार किमतीची एक होंडा शाईन दुचाकी, १५ हजाराची एक बजाज प्लॅटिना, प्लास्टिकचा पाईप असे सुमारे २ लाख ७० हजार ५५० रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.
त्याठिकाणी सापडलेल्या टाक्यांमधील कुजके नाशवंत रसायन पंचांसमक्ष जागीच ओतून नष्ट करण्यात आले तसेच इतर अवजड लोखंडी पिंप व २०० फूट लांबीचा पाईप, चिंधी असे साहित्य जप्त करून ताब्यात घेण्यात आले आहे. प्लास्टिकच्या टाक्या जंगलमय भागातून बाहेर काढणे व त्यांची वाहतूक करणे अशक्य असल्याने त्या जागीच तोडफोड करुन नष्ट करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार सुशांत रंगराव घाडगे यांनी खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून, अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.