चिपळूण : तालुक्यातील वालोपे येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि पोलिसांनी तीन ठिकाणी धाड टाकली. या धाडीत बेकायदा गावठी दारू बाळगून त्याची विक्री होत असल्याचे निदर्शनास येताच गावठी दारूसह साहित्य असा एकूण १६ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच सचिन विजय मयेकर, रुपेश दत्ताराम आंबरे आणि दिलीप महादेव मयेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
चिपळूण वालोपे येथे मोठ्या प्रमाणात गावठी दारूची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला व चिपळूण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तसेच चिपळूण पोलिसांनी बुधवारी दुपारी वालोपे येथे धाडसत्र सुरू केले. त्या वेळी वालोपे गणेशवाडी येथे सचिन विजय मयेकर (३८) याच्याकडे विनापरवाना गावठी दारू आढळून आली. त्याच्याकडून गावठी दारूसह १,८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पाठोपाठ वालोपे देऊळवाडी येथेदेखील पोलिसांनी छापा मारला. त्या ठिकाणी रुपेश दत्ताराम आंबरे यांच्याकडेदेखील विनापरवाना बेकायदा गावठी दारू आढळून आली. त्याच्याकडून गावठी दारूसह ५६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सायंकाळी ५ वाजता वालोपे गणेशवाडी येथे पोलिसांनी धाड टाकली. त्या ठिकाणी दिलीप महादेव मयेकर याच्याकडे तब्बल २८५ लीटर गावठी दारू सापडली. त्याची किंमत १४,२५० इतकी आहे. अशा एकूण तीन धाडींत पोलिसांनी १६ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.