लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी / चिपळूण : बनावट अॅक्सेसरीज विक्री करणाऱ्या रत्नागिरीतील तीन आणि चिपळुणातील दोन मोबाईल दुकानांवर पोलिसांनी छापा टाकला. या दोन्ही छाप्यात पोलिसांनी सुमारे साडेपाच लाख रुपयांचे बनावट अॅक्सेसरीज जप्त केले आहेत. याप्रकरणी पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल विक्री करणाऱ्या दुकानांमधून बनावट वस्तू विक्री केल्या जात असल्याची बाब या धाडींमुळे उघड झाली आहे. रत्नागिरीतील खेतेश्वर, महालक्ष्मी व नागणेशी मोबाईल शॉपी या दुकानांवर पोलिसांनी छापा मारून लाखो रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. निखिल दिनकर पाटील (२६, रा. शाहू मिल कॉलनी, कोल्हापूर) हे इन्टेक्स कंपनीचे तपासणी अधिकारी आहेत. रत्नागिरी शहरात आठवडा बाजार परिसरात असलेल्या खेतेश्वर, नागणेशी व महालक्ष्मी या मोबाईल दुकानांमध्ये मोबाईलच्या बॅटऱ्या व इतर बनावट अॅक्सेसरीज विक्री होत असल्याची त्यांना माहिती मिळाली होती. त्यामुळे निखिल पाटील यांनी पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांची भेट घेऊन माहिती दिली. विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रमसिंग पाटील यांच्या एका पथकाने आठवडा बाजार परिसरात जाऊन प्रथम खेतेश्वर दुकानावर छापा मारला. त्यानंतर बाजूला असलेल्या महालक्ष्मी व नागणेशी या मोबाईल दुकानांवर छापा मारला. याठिकाणी पोलिसांनी सुमारे पावणे दोन लाखांचा बनावट ऐवज जप्त केला आहे. कॉपीराईटप्रकरणी पोलिसांनी बगताराम मल्लाजी पुरोहीत (रा. मुंबई), हरसनराम नाथुजी पुरोहीत (रा. तेली आळी) व महेंद्रसिंग पर्वतसिंग राठोड या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चिपळूणमध्येही याच पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे. चिपळुणात दोन मोबाईल शॉपींच्या मालकांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांकडून साडेतीन लाखांचे बनावट साहित्य जप्त करण्यात आले आहे. मनोजकुमार देवरामजी परमार व छगनराम मेघाजी चौधरी (दोघे रा. चिपळूण) अशी त्यांची नावे आहेत. निखिल पाटील यांनीच तेथेही गुन्हे दाखल केले आहेत. त्यांनी येथील पोलिसांच्या मदतीने शनिवारी सायंकाळी ४ वाजता या दोन्ही मोबाईल शॉपीवर छापा टाकला. यावेळी तेथे असलेल्या साहित्यावर इंटेक्स कंपनीचे ओरिजनल होलोग्राम व बारकोड दिसून आला नाही. त्यामुळे या दोन्ही दुकानांमधून ३ लाख ४४ हजार ५५० रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये २६९ बॅटऱ्या, २२९ क्लिप कव्हर, ८१ बॅक कव्हर जप्त करण्यात आले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तेजस्विनी जाधव करीत आहेत.
रत्नागिरी-चिपळुणात मोबाईल दुकानांवर छापे
By admin | Published: June 21, 2017 1:09 AM