रत्नागिरी : सुमारे दहा-बारा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची मुसळधार सुरू आहे. गेल्या पाच सहा दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकूण ९२४.६० (सरासरी १०२.७२) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वच तालुक्यांमध्ये पावसाचा जोर आहे. त्यामुळे पडझड होण्याचे प्रकार, तसेच पाणी भरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यात हर्णे येथील विक्रांत मयेकर यांच्या गाडी पार्किंगमध्ये पाणी शिरल्याने गाडीचे १ लाख २० हजारांचे नुकसान झाले आहे. बुरोंडी येथील हाजिरा इस्माईल बुरोडकर यांच्या घराचे अंशत: १५ हजार रुपयांचे नुकसान. ओणनवसे-गुडघे-उंबरघर रस्ता खचला आहे. मात्र, वाहतूक सुरू आहे. खेड-दापोली रस्त्यावर पुराचे पाणी आले होते. सकाळी वाहतूक सुरळीत झाली आहे.
मंगळवारीही सकाळपासून पावसाचा जाेर कायम आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने चांगलाच गारठा निर्माण झाला आहे.