असगोली : सलग पडणाऱ्या पावसामुळे गुहागर तालुक्यातील आठ घरांचे सुमारे १ लाख ३९ हजार ५० रुपये इतके नुकसान झाले आहे. तलाठी आणि ग्रामसेवकांनी सर्व घरांचा पंचनामा केला आहे.
तालुक्यात सलग तीन दिवस पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे पालशेत व अंजनवेल येथील बाजारपुलावरुन पाणी वाहत होते. सतत पडणारा पाऊस आणि मे महिन्यात झालेले वादळ यांचा दुहेरी फटका काही घरांना बसला. वादळात पिळवटून निघालेल्या, अर्धवट मोडलेल्या फांद्या सलग पडणाऱ्या पावसामुळे घरांवर पडल्या. पडवे येथील शशिकांत रामचंद्र सुर्वे यांच्या घरावर झाडाची फांडी पडून ६९ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. तर पडव्यातील समजाद रशिद शिरगावकर यांच्या घरावरही फांदी पडून १० हजार रुपयांचे आणि कैसर रमजान शिरगावकर यांच्या घराचे ९ हजारांचे नुकसान झाले आहे. अडूर येथील सुरेश काशिनाथ रसाळ यांच्या घराचे २५ हजारांचे व काशिनाथ भिवा रसाळ यांच्या घराचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मळणमधील गंगा गणू आलीम यांच्या घराच्या पडवीत कौले पडून २ हजार ३५० रुपयांचे, काजुर्लीतील अमिता अनंत डिंगणकर याच्या पडवीची कौले पडून २ हजार ५० रुपयांचे व पांगारतील राजेश रामचंद्र बेंडल यांच्या घरावरील कौले पडून व वासा मोडून ६ हजार २५० रुपयांचे नुकसान झाले आहे.