रत्नागिरी : गेला आठवडाभर पावसाने विश्रांती घेतली असली तरी सरीवर पाऊस कोसळत आहे. त्यामुळे भातशेतीची कामे अविश्रांत सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ७९५६.८० मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. समुद्र मात्र खवळलेला असून, किनाऱ्यावर उंच लाटांचा मारा सुरू आहे. पावसाने विश्रांती घेतली असल्याने जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना झाल्याची नोंद नाही.
जिल्ह्यात २४ तासात १२३.३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथील रामचंद्र बैकर यांच्या घराचे पावसामुळे काहीअंशी नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जगबुडी, वाशिष्ठी, काजळी, कोदवली, शास्त्री, सोनवी, मुचकुंदी, बावनदी या नद्यांनी निम्म्यापेक्षा जास्त पाण्याची पातळी गाठली आहे. सरीवर पाऊस सुरू असला तरी भात लागवडीच्या कामात मात्र व्यत्यय आलेला नाही. पाणी उपलब्ध असलेल्या क्षेत्रावर प्राधान्याने लागवड करण्यात येत आहे. यावर्षी पाऊस सुरूवातीपासून चांगला झाल्याने शेतीची कामे वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मंडणगड तालुक्यात ८५२.७० मिलिमीटर, दापोली ६३५ मिलिमीटर, खेड १२७४.१० मिलिमीटर, गुहागर ९८६.७० मिलिमीटर, चिपळूण ८३०.६० मिलिमीटर, संगमेश्वर ८९२.५० मिलिमीटर, रत्नागिरी ९७५.१० मिलिमीटर, लांजा ७८१.३० मिलिमीटर, राजापूर तालुक्यात ७२८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात झाला असून, सर्वात कमी पाऊस दापोली तालुक्यात झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २,२८८.०७ मिलिमीटर इतका जास्त पाऊस झाला आहे.