रत्नागिरी : जिल्ह्यात गेले दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रभर संततधार कायम ठेवली होती. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर येथे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पहाटेपासून पावसाचा जोर ओसरल्याने पाणी ओसरू लागले आहे.जिल्ह्यात कोसळलेल्या पावसामुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना व कोदवली नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. त्यामुळे पुराचे पाणी राजापूर शहरात घुसले होते. तर चिपळूण येथील वाशिष्ठी नदीचेही पाणी वाढल्याने शहरातील काही भागात पुराचे पाणी आले होते. खेडमधील जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन इशारा पातळी गाठली होती. त्याचबरोबर संगमेश्वर तालुक्यातील गडनदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन संगमेश्वर आणि माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले होते. मात्र, पहाटेपासून पावसाचा जोर कमी झाल्याने शहरात शिरलेले पुराचे पाणी ओसरू लागले आहे.जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार मंडणगड तालुक्यात मौजे अडखळ येथील बंडू यशवंत हिलम यांच्या घराचे पावसामुळे अंशत: ४७ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.दापोली तालुक्यात मौजे भडवळे येथील ओंकार रामचंद्र खरे यांच्या घराचे पावसामुळे अंशत: २५ हजार, चिपळूण तालुक्यातील मौजे कापसाळ येथील सुरेखा सुरेश साळवी यांच्या घराचे पावसामुळे अंशत: ६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
गुहागर तालुक्यात मौजे आरे येथील केतन नवनाथ भोसले (वय ३४) हे ११ जुलै २०२१ रोजी कातळवाडी नदीवर पोहण्यासाठी गेले असता बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तसेच मौजे पडवे येथील वसंत गणपत राऊत यांच्या ३ म्हशी पऱ्यात पडून त्यातील १ मृत्यू व २ जखमी होऊन अंशत: १ लाख ५० हजारांचे नुकसान झाले आहे.संगमेश्वर तालुक्यात मौजे कोळंबे येथील बंडू लिगांयत यांच्या पडवीचे पावसामुळे अंशत: ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. मौजे पाटगाव येथील रामचंद्र सोनू पागार यांच्या विहिरीचे पावसामुळे अंशत: ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर राजापूर तालुक्यात मौजे तळवडे येथील बाबाजी गोरे यांच्या घरात पाणी शिरल्याने अंशत: नुकसान झाले आहे.