रत्नागिरी : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात काही भागात पावसाने शिडकावा करण्यास सुरुवात केली आहे. आज, मंगळवारी सकाळपासून मळभ दाटून आले. त्यानंतर पावसाच्या हलक्या सरी सर्व तालुक्यात कोसळल्या. मात्र, मंडणगड तालुक्यात दुपारच्या सुमारास सलग दोन तास जोरदार पाऊस पडत होता.गेल्या काही दिवसांपासून हवामान खात्याने कोकणात पावसाची शक्यता वर्तविली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना तीन ते चार दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. रत्नागिरीत अधूनमधून किरकोळ सरी पडत आहेत.
आज, सकाळपासून मळभाचे वातावरण होते. सकाळी मेघगर्जनेसह काही तालुक्यांमध्ये पावसाने हलक्या सरींनी हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, मंडणगड वगळता अन्य तालुक्यांमध्ये हलक्या सरी पडल्या. यापावसाचा आंबा बागायदारांना फटका बसला.