रत्नागिरी : रविवार रात्रीपासून पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. सोमवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला होता. दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण २६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याकडून ८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर घेतला आहे. अधूनमधून उन्हाचे दर्शन होत असले तरी मध्येच जोरदार सरी कोसळत आहेत. रविवार सकाळपासूनच जोरदार सरी कोसळू लागल्या होत्या. रात्रीही पावसाने चांगलाच जोर धरला होता. हवामान खात्याने ५ ते ८ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.
सोमवारी सकाळीही पावसाने अधिकच जोर घेतला. सकाळी जोरदार सर कोसळल्यानंतर काही काळ उन्हे पडू लागली होती. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर अधिकच वाढला. पावसाची संततधार सुरू राहिल्याने वातावरणातही चांगलाच गारठा निर्माण झाला. सायंकाळीही पावसाचा जोर कायम होता. अजूनही दोन दिवस पाऊस मुसळधारेने पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज पाऊस तंतोतंत खरा करणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एकंदरीत सप्टेंबर महिन्यात पावसाचे जोरदार ‘कम बॅक’ झाले आहे.
सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होत जाते. परंतु यावेळी पाऊस अजूनही जोरदार पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आता हा पाऊस असाच राहिला तर शेतीचे काय, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे अजूनही पाऊस हवा असला तरीही त्याचे प्रमाण मर्यादित राहावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून करण्यात येत आहे.