रत्नागिरी : जिल्ह्यात मंगळवार रात्रीपासून पावसाने संततधार धरली असून, बुधवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिला. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण ६९७.२० मिलिमीटर (सरासरी ७७.४७ मिलिमीटर) पावसाची नोंद झाली आहे. खेड तालुक्यात सर्वाधिक पाऊस (१६४.४० मिलिमीटर), तर त्याखालोखाल गुहागर तालुक्यात (१०६ मिलिमीटर) झाला आहे. पावसाच्या संततधारेने वातावरणातही गारवा आला आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दापोली कॅम्प येथील एज्युकेशन सोसायटीची विजेच्या धक्क्याने विद्युत उपकरण जळून खाक झाले असून, अंशत: ५ लाख ९१ हजार १३० रुपयांचे नुकसान झाले. माटवण येथे सार्वजनिक पाण्याच्या टाकीची एका बाजूकडील संरक्षक भिंत पडून अंशत: चार हजार रुपयांचे नुकसान झाले. बांधतिवरे येथे गोविंद शिंदे यांच्या घराचे अशंत: १६ हजार ५० रुपयांचे नुकसान झाले. कळंबट येथे शेवंती महाबळे यांच्या घराचे अंशत: ६५ हजार ६५० रुपयांचे नुकसान झाले.
चिपळूणमध्ये विभागातील वनोशी-पन्हाळ दरड कोसळल्याने हा रस्ता बंद झाला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरू आहे. खेड-दापोली राज्य मार्गावर दरड कोसळल्याने रस्ता बंद असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरू आहे. राजापूर तालुक्यात हातिवले येथे संजय शिंदे यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळल्याने अंशत: नुकसान झाले आहे. कोंडवाडी येथे अनंत राहटे यांच्या गोठ्याचे अंशत: नुकसान झाले आहे. कोळवण येथे निता शिवाजी मोरे यांच्या घराचे अंशत: नुकसान झाले आहे. चौके येथे प्रकाश शिवाजी चिंदरकर यांच्या घराचे अंशत: नुकसान झाले. कुंभवडे येथे जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत कोसळल्याने अंशत: नुकसान झाले आहे. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
बुधवारी सकाळपर्यंत पावसाची संततधार कायम होती. ११.३० वाजण्याच्या सुमारास विश्रांती घेतल्यानंतर काही काळ नागरिकांना सूर्यदर्शनही झाले. मात्र, दुपारी पुन्हा पावसाची संततधार सुरूच झाली. मध्येच किरकोळ विश्रांती घेत दिवसभर जोरदार सरी कोसळत होत्या.