रत्नागिरी : जादूटोण्याच्या सहायाने ‘पैशाचा पाऊस’ पाडून देतो, असे सांगून २५ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या सातजणांची टोळी ताब्यात आल्यानंतर आता त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत या टोळीकडून रोख पावणे आठ लाख रुपयांसह सोन्याचे दागिने, स्कॉर्पिओ कार असा ११ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांनी दिली.पैशाचा पाऊस प्रकरणाची बरीचशी उकल झाली आहे. त्याबाबतची माहिती देण्यासाठी प्रणय अशोक यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक तुषार पाटील, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक एस. एल. पाटील, मंडणगडचे पोलिस निरीक्षक प्रदीप मिसर उपस्थित होते.पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून आपल्याकडून २५ लाख रुपये लुटण्यात आल्याची तक्रार रत्नागिरीतील सुधाकर पांडुरंग सावंत यांनी मंडणगड पोलिस ठाण्यात दिली होती. यातील मुख्य सूत्रधार राजू मारुती पवार हा साथीदारांसह पैशांचा पाऊस पाडतो, असे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करीत होता.१ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी या कालावधीत सुरले या गावी सुधाकर सावंत यांना राजू पवार हा भोंदू महाराज बनून येत होता. तो आणि त्याचे साथीदार मगन पवार, अतुल शंकर मनगेकर, पंडित ऊर्फ बंटी गंगाराम भोये, सुजित अशोक लांबगे, राजेंद्र एकनाथ बनसोडे, एकनाथ मोहन गवळी यांनी एकमेकांच्या संगनमताने जादूटोण्याच्या सहायाने पैशाचा पाऊस पाडतो, अशी प्रलोभने दाखवित होते. वेळेवर पूजा न केल्यास माणूस मरेल, अशी भीतीही सावंत यांना दाखविण्यात आली होती. त्यातून सावंत यांच्याकडून २५ लाख रुपये उकळण्यात आले. सावंत यांनी तत्काळ मंडणगड पोलिस ठाण्यात या भोंदू महाराजासोबत तक्रार दाखल केली. त्या आधारावर या गुन्ह्याचा तपास युद्धपातळीवर सुरू करण्यात आला. काही दिवसांतच राजू पवार या भोंदू महाराजासह सहाजणांना अटक करण्यात पोलिस निरीक्षक प्रदीप मिसर यांना यश आले, असे प्रणय अशोक यांनी सांगितले.यातील राजू पवार, मगन पवार, अतुल मुनगेकर, बंटी भोये, सुजित लांबगे, राजेंद्र बनसोडे व एकनाथ भिसे यांना मंडणगड पोलिसांनी नवी मुंबई, नाशिक, धुळे, औरंगाबाद, अहमदनगर या ठिकाणांवरून अटक केली. दरम्यान, या टोळीने अन्य काही जिल्ह्यांमध्ये असे प्रताप केले आहेत का, किंवा या गुन्ह्यांमध्ये आणखी काही सामील आहेत का, याचा तपास युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती प्रणय अशोक यांनी दिली. (वार्ताहर)आणखी गुन्हे उघडकीससराफांना गंडा घालून लाखो रुपयांचे सोने लंपास करणारी टोळीही पोलिसांच्या हाती लागली आहे. या टोळीचे लांजा, रत्नागिरी, भुदरगड, सांगली, आजरा, राधानगरी, निपाणी, राजगड, आदी ठिकाणाचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यांतील सुमारेआठ लाख ४३ हजार ६०१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहितीही प्रणय अशोक यांनी यावेळी दिली.बदनामीची भीती !या टोळीतील आरोपी सराईत आहेत. प्रतिष्ठित नागरिकांना गाठून पैशाचा पाऊस पाडून देतो, असे सांगायचे आणि एका विशिष्ट जागी नेऊन लोकांची फसवणूक करायची, असा या टोळीचा ‘उद्योग’ होता. फसलेले प्रतिष्ठित नागरिक बदनामीच्या भीतीने पोलिसांसमोर येण्यास घाबरत असल्याने गुन्हा दाखल होण्यास उशीर झाला असल्याचे मंडणगडचे पोलिस निरीक्षक प्रदीप मिसर यांनी सांगितले.
पैशाचा पाऊस; १२ लाखांचा माल हस्तगत
By admin | Published: June 16, 2016 11:43 PM