दापोली : तालुक्यात बुधवारी काेसळलेल्या जोरदार पावसामुळे गरिबांचा संसार पाण्यात भिजून गेला आहे़ दापोली-खोंडा परिसरातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या झोपड्यांमध्ये पावसाचे पाणी गेल्याने अवघा संसार पाण्यात भिजून गेला आहे.
चक्रीवादळ पुढे सरकले असले तरी समुद्राचे उधाण कायम आहे. त्यामुळे वादळानंतरही परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्याचे पाहायला मिळत आहे़ तालुक्यात बुधवारी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे़ चक्रीवादळानंतर परिस्थिती पावसामुळे गंभीर बनली आहे़ समुद्र खवळलेला असल्याने समुद्र किनारपट्टीच्या घरांना अजूनही धोका कायम आहे़ जोरदार वारा, पाऊस यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत़ पावसाला अजून उशीर असल्याने अनेकांनी आपल्या घरांची शाकारणी केलेली नाही़ अनेकांनी घरांची दुरुस्तीही केलेली नाही़ मात्र, वादळानंतरही पावसाची संततधार सुरू असल्याने झाेपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांचे हाल झाले आहेत़