रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून पावसाचे प्रमाण पुन्हा कमी झाले आहे. ठराविक सर वगळता दिवसभर ऊन पडू लागल्याने भरपावसात उकाड्याचा त्रासही नागरिकांना होऊ लागला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात १२०.४० मिलीमीटर (सरासरी १३.३८ मिलीमीटर) पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली आहे.
पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी जिल्ह्यात अधूनमधून घरे, गाेठे यांच्या पडझडीला प्रारंभ झाला आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, दापोली तालुक्यात अडखळ येथे राजश्री शंकर मळेकर यांच्या घराचे अंशत: नुकसान झाले. चिपळूण तालुक्यात वाडी-जैतापूर वाडी बेलदार येथे दरड कोसळली आहे. सा.बां. विभागाकडून दरड हटविण्याचे काम चालू आहे. यावरून एकेरी वाहतूक सुरू आहे.
संगमेश्वर तालुक्यात कोंडगाव येथे सुभाष बने यांच्या पंपाजवळील संरक्षक भिंत पावसामुळे कोसळल्याने अंशत: नुकसान झाले. गोळवली येथे शंकर वासू किंजळे यांच्या घरावर वीज पडून घरातील वीज मीटरचे अंशत: नुकसान झाले. कोणतीही जीवितहानी नाही, असे जिल्हा नियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आले आहे.