रत्नागिरी : पावसाने थोडी उसंत घेतल्याने जिल्ह्यातील वाशिष्ठी, जगबुडी आणि अर्जुना या तीनही प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. जगबुडीची पातळी कमी झाली असली तरी अजूनही पाणी धोका पातळीपेक्षा अधिक आहे. दरम्यान वाशिष्ठीच्या काल वाढलेल्या पाण्यामुळे त्यावरील पुलाच्या भरावाचा काही भाग वाहून गेला आहे.
पाऊस आता सरींवर असल्याने वशिष्ठी नदीची पातळी ४.२२ मी म्हणजेच इशारा पातळीच्या खाली आहे. शहरात सध्या कोणत्याही ठिकाणी पाणी नाही. पोफळी, कोळकेवाडी, चिपळूण या परिसरात पहाटे ५ पासून पाऊस बंद आहे. बुधवारी सकाळी चिपळूण शहरातील एका कुटुंबातील ( शिंदे) ३ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आले होते. त्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने सायंकाळी आणखी १६ व्यक्तींना त्यांच्या नातेवाईकांच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. मिरजोळी जुवाड येथील १९ कुटुंबातील ६५ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आले आहे.
बुधवारी सायंकाळी मौजे कान्हे (ता. चिपळूण) येथे घराजवळ दरड कोसळल्याने ३ कुटुंबातील १६ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आलेले आहे. कुंभार्ली घाटात वाहतूक सुरळीत सुरू आहे. परशुराम घाटात दुहेरी वाहतूक सुरळीत सुरू आहे. परशुराम घाटात लाईटची व्यवस्थाही करण्यात आली आहे. वाशिष्ठीप्रमाणे राजापुरातील अर्जुना नदीची पाणी पातळीही घटली आहे. तीही इशारा पातळीपेक्षा कमी आहे. जगबुडीची पाणी पातळीही घटली आहे. मात्र ती अजून धोका पातळीच्या वर आहे. दरम्यान, रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्टी पुलाच्या भरावाचा काही भाग बुधवारी रात्री वाहून गेला. त्याने वाहतुकीला काही फरक पडला नसला तरी तो लवकरात लवकर भरणे गरजेचे झाले आहे.