रत्नागिरी : जवळजवळ महिन्याभराची प्रतीक्षा करायला लावून सर्वांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या पावसाने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात आगमन करताना जिल्ह्याला चांगलाच दणका दिला आहे. अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. दापोलीमध्ये चार दिसांपूर्वी बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा मृतदेह भोपण खाडीमध्ये सापडला आहे.या पावसाचा सर्वाधिक फटका देवरूख, संगमेश्वरला बसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. चिपळूण, खेड, मंडणगडलाही दमदार पाऊस सुरू होता. ग्रामीण भागातील शेतकऱ्याला मात्र पावसाने दिलासा दिला. गुरूवारी दुपारनंतर पावसाला सुरूवात झाली. थोडी-थोडी विश्रांती घेत पाऊस अजून सुरूच आहे. (प्रतिनिधी)देवरुख : आज देवरूख, संगमेश्वर परिसराला पावसाने झोडपून काढले. देवरुख बाजारपेठेतील जुनाट वटवृक्ष कोसळून त्याखाली एक रिक्षा, दोन मोटारसायकल आणि तब्बल २४ दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. संगमेश्वर रिक्षा स्टँडजवळ जुनाट वृक्ष कोसळून मुंबई - गोवा महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प होती. रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या पावसाने देवरूख परिसरात ४७ लाख १९ हजार रूपयांचे नुकसान झाल्याबाबतचा पंचनामा देवरूख महसूलने केला आहे.देवरूख येथील महाकाय वटवृक्ष दूर करण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू होते. त्यात महेश जागुष्टे (ओझरे खुर्द), संतोष शिगवण (निवे बुद्रुक), सोमा जाधव (कुडवली) यांना किरकोळ दुखापत झाली. संगमेश्वरमध्येही वृक्ष कोसळला. या दोन्ही घटनांमध्ये प्राणहानी झाली नाही. देवरुखमधील वटवृक्षाखाली संतोष अनंत करंडे यांची रिक्षा (एमएच ०८ पी ७११६) चेपली गेली. भाडे आणण्यासाठी सोळजाई मंदिराच्या दिशेने जात असताना वृक्ष समोर आपल्याकडे झेपावत असल्याचे कळताच त्याने रिक्षातून उडी मारली. जवळच असणाऱ्या संतोष मांगले यांच्या दोन मोटरसायकल, रिक्षा व १२ दुकानांचे झाडामुळे नुकसान झाले आहे. फैरोज मणेर, मेहबूब पुजारी, राजू केदारी, अमित चव्हाण, ओम साई स्वीट मार्ट, दीपक देवरुखकर, बंटी चव्हाण, अभिजीत चव्हाण, बाळू ढवळे, लक्ष्मी बेकरी, साखरपेकर यांचे चप्पल मार्ट या दुकानांची वृक्ष कोसळल्याने हानी झाली आहे. लांजा : गेला महिनाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी रात्रीपासून जोरदार सुरुवात केल्याने शेतकरीवर्ग आनंदीत झाला आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास निष्कर्ष हॉस्पिटलजवळ महामार्गावर झाड पडल्याने एकेरी वाहतूक सुरू चालू होती. संततधार कोसळणाऱ्या या पावसामुळे नदी, नाले वाहू लागले आहेत. त्यामुळे सध्या तरी पाण्याची टंचाई दूर झाली आहे. गावोगावी शेतकरीवर्ग शेतीच्या कामात मग्न असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
पावसाचे थैमान, मोठे नुकसान
By admin | Published: July 12, 2014 12:35 AM