रत्नागिरी : केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याने आता जिल्ह्यासह महाराष्ट्रात ११ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आल्याने आता जिल्ह्याला मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. सध्या मान्सूनपूर्व वादळी पाऊस काही ठिकाणी पडू लागला आहे. पुढील दोन दिवसातही वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात एकूण २१९.७० मिलिमीटर (सरासरी २४.४१ मिलिमीटर) पावसाची नोंद येथील जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पाऊस पडू लागला आहे. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांच्या अहवालानुसार खेड, दापोली, गुहागर, चिपळूण आदी तालुक्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. संगमेश्वर, रत्नागिरीतही रात्री पाऊस झाला. दिवसभर वातावरण ढगाळ होते. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात कुठलेही नुकसान झाले नसल्याचे कळविण्यात आले आहे.
गुरूवारी मात्र दिवसभर पावसाचे वातावरण होते. अधूनमधून पाऊस सुरूच होता. त्याचबरोबर ढगांचा गडगडाटही सुरू होता. सायंकाळनंतर जोरदार पावसाची चिन्हे दिसत होती. हवेत काहीसा गारवाही आला होता. त्यामुळे मान्सून सुरू होईपर्यंत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी जिल्ह्यात राहणार असल्याचा अंदाजही जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात दि. ४ व ५ जून या कालावधीत काही ठिकाणी विजांच्या गडगटासह व ताशी ३० ते ४० किलोमीटर वाऱ्यासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. संबंधितांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.