राजापूर : गेले दोन दिवस तालुक्यात संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे अर्जुना व कोदवली नद्यांना आलेला पूर ओसरला असून, जनजीवन पूर्वपदावर आले आहे. ग्रामीण भागात काही गावांत वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे घरे आणि गोठ्यांची पडझड झाली आहे.
शनिवार आणि रविवार अशा दोन दिवशी राजापूर शहर आणि तालुका परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावत संततधार धरली होती. सोमवारीही दिवसभर संततधार पाऊस पडला होता. त्यामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला होता. मात्र मंगळवारी पावसाने काहीशी उघडीप दिली. त्यामुळे कोदवली व अर्जुना नद्यांना आलेला पूर ओसरला असून, जनजीवन पूर्ववत सुरू झाले आहे. ग्रामीण भागात पुन्हा एकदा पेरणीच्या कामाला जोमाने सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.
दोन दिवस संततधार पडलेल्या पर्जन्यवृष्टीत ग्रामीण भागात काही ठिकाणी पडझड झाल्याच्या घटना घडल्या. मात्र कुठेही मोठी वित्तहानी व जीवित हानी झालेली नाही. हातिवले येथील संजय शिवराम शिंदे यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळून नुकसान झाले आहे. ओणी कोंडवाडी येथील अनंत कृष्णा रहाटे यांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे. कोळवणखडी येथील नीता शिवाजी मोरे यांच्या घराची पडझड झाली आहे. कुंभवडे जि. प. शाळा नं. २ ची संरक्षक भिंत कोसळली असून, चौके येथील प्रकाश शिवाजी चिंदरकर यांच्या घराची पडझड झाली आहे.
शनिवार ते मंगळवार या कालावधीत झालेल्या पावसातील नुकसानीबाबत स्थानिक पातळीवर मंडल अधिकारी, तलाठी, कृषी कर्मचारी यांना प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिले आहेत.