आवाशी : खेड तालुक्यातील लाेटे येथील पेट्राेल पंपातील पेट्राेल व डिझेलच्या टाकीत पावसाचे पाणी शिरले हाेते. त्यामुळे साेमवारी दिवसभर पेट्राेल व डिझेल विक्री बंद ठेवण्यात आली हाेती.
मुसळधार पावसाने खेड तालुक्याला झाेडपून काढले. तालुक्यातील सर्वच भागात पावसाची संततधार सुरू हाेती. काही ठिकाणी पाणी भरले हाेते. पावसाचा फटका लाेटे येथील हिंदुस्थान पेट्राेलियम कंपनीच्या पेट्राेल पंपाला बसला. पावसाचे पाणी कंपनीच्या पेट्रोल पंप आवारात घुसले. त्यामुळे जमिनीत असलेल्या पेट्राेल व डिझेलच्या टाकीत पावसाचे पाणी शिरून माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत पेट्राेलपंप चालक रेडीज यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार या पंपालगत मुंबई - गाेवा महामार्ग चाैपदरीकरणाचे काम सुरू असल्याने पेट्राेलपंपालगत असणाऱ्या पुलाखालून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यात महामार्गावरील काढलेली माती पुलाखाली टाकल्याने नाल्याचा प्रवाह बुजला गेला. परिणामी नाल्याच्या पाण्याला अडथळा निर्माण झाल्याने पाण्याने पेट्राेलपंपात प्रवेश केला. यामुळे पेट्राेलपंप आवारात हे पाणी घुसले. त्यामुळे जमिनीत असणाऱ्या पेट्राेल व डिझेलच्या टाकीत पाणी शिरले. याची माहिती मिळताच येथील तलाठी डी. एस. ढगे हे पंचनाम्यासाठी पेट्राेल पंपात गेले. मात्र, मालकच हजर नसल्याने पंचनामा हाेऊ शकला नाही. परिणामी आज दिवसभर पेट्राेल व डिझेलची विक्री बंद असल्याचे समजते.