पावसाळ्याआधी महिनाभर सुमारे शंभर दीडशे झापे वळायची जबाबदारी बाबा आम्हा मुलांवर सोपवायचा. तेवढ्या वेळात बाबा इतर कामे करायचा. माडाच्या सुकून पडलेल्या झावळ्या रात्रभर तळ्यात बुडवून ठेवून सकाळपासून आम्ही त्या वळायचो. अशा चुडतांपासून झापे वळायची कला मी माझ्या आजोबांकडून अवगत केली होती. माझे आंधळे आजोबा सरावल्या हातांनी अशा झावळ्या चटचट वळायचे. झाप वळून त्याला गाठी मारणे हे एक कसब होते. झापांना गाठी मारण्याचे कसब मला चांगले जमले आहे? असे माझे आजोबा सांगत. आम्ही अशी वळलेली झापे एकावर एक व्यवस्थित डाळून ठेवल्यावर मग बाबा त्याच्या फुरसतीने गोठा, पडवी, भरवड, धड्या शाकारण्यास घेत असे. पावसाचे पाणी भिंतीवर पडून मातीच्या भिंती पावसात कोसळू नयेत म्हणून बाबा त्यांना अशा झापांनी शाकारत असे. सध्या वापरात नसलेले पण आज, उद्या कधीतरी उपयोगात येणारे जुने वासे एका ओसरीत मेडींच्या आधाराने डाळून ठेवण्याची तेव्हा पद्धत होती. त्यालाच ‘भरवड’ म्हणत. आमची भरवड तशी वासे व चिवारीच्या काठ्यांनी भरलेली असे. आता अशा भरवडी कुठे राहिल्या आहेत? घराच्या सौंदर्याच्या दृष्टीला आता शहरीकरणाची कड दिसते. अशा संकल्पनेत ओसरी व भरवड ‘आऊउटडेटेड’ झाली आहे. आताच्या पावसाच्या तयारीत ही कामे आता येत नाहीत.
दरवर्षी सरायनंतर लागवट लागली की, जंगलातून तोडून आणलेला लाकूडफाटा मोकळ्या कुणग्यात माचावर डाळून ठेवत असत. प्रत्येक घरासमोरचे असे लाकडांचे माच त्या-त्या घरातल्या मनुष्यबळाचे व समृद्धीचे दर्शन घडवत असत. अशा माचातला लाकूडफाटा पावसाआधी पडवीत सुरक्षित हलवणे हा एक-दोन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम असे. लाकूडफाटा, शेणी, गोवऱ्या पडवीत हलवताना खूप गमतीजमती घडत. माझा बाबा पावसाळ्याआधीच दोन चांगले नांगर, दोन कोळशी, गुठा, दाता जू, इशाड यासारख्या अवजारांची व्यवस्था करून ठेवत असे. ‘तुकल्याक येळ नाय नि इष्ण्याचो घरात पाय नाय... मिरगाआधीच एकेक वस्तू आकरेकून ठेवक होयी.’ असे बाबा नेहमी सांगायचा. आज ही सगळी अवजारे इतिहासजमा झाली आहेत.
पावसाळ्याआधी बेगमीच्या मसाल्याचे काम करताना, मसाल्याचे सामान जमवताना आईची खूप धांदल होत असे. मसाला कुटण्यासाठीच्या गिरणीवर या काळात खूप गर्दी असे. अशा गिरणीजवळून जाताना नाकातून शिंकांवर शिंका येत, पण नव्या मसाल्याचा झणझणीत वास खवय्या मनाला आतून सुखावत असे. गिरणवाला सुध्या दिवसभर मसाल्याच्या गिरणीजवळ कसा काम करत असेल, याचे तेव्हा खूप कौतुकही वाटत असे. आता असा मसाला दुर्मीळ झाला आहे. प्रत्येक रेसिपीसाठी बाजारात ‘स्पेशल’ मसाले उपलब्ध असल्याने घरचा मसाला तयार करण्याची तसदी कमी झाली आहे. पूर्वी पावसाळ्याआधी बाबा भाईच्या दुकानातून जाड्या मीठाची फरी विकत आणत असे. भाईच्याच दुकानातून आणलेल्या लाल छत्री चहाच्या देवनारच्या रिकाम्या खोक्यात भरून ठेवलेले ते मीठ वर्षभर पुरत असे. अशाचप्रकारे बाबा दरवर्षी पावसाळ्याआधी कांद्यांची कोतळी विकत आणून वर्षभराची कांद्यांची सोय करत असे. घरात पसरून ठेवलेले थोडेफार कांदे कुजले की मग मात्र घराचे कुरुक्षेत्र होत असे.
दरवर्षी पावसाआधी भरणाऱ्या बाजारातून बाबा घोंगडी आणायचा. अख्खा पाऊस अंगावर घेताना अशा घोंगडीचा बाबाला खूप आधार वाटायचा. पावसाच्या गारठ्यात घोंगडीतली ऊब बाबाला सुखद वाटत असे. पावसाळ्याच्या तयारीत आता घोंगडीला जागा नाही. पूर्वी वर्षानुवर्षे शिवून व दुरुस्त करुन वापरात असलेल्या छत्र्यांची आताच्या नाजूक छत्र्यांना सर नाही. त्याकाळात नवीन छत्री घेतली तर तिच्यावर नाव रंगवून घेण्यासाठी गावातल्या बाबुराव पेंटरकडे लोकांची रांग लागे. बाबुराव छत्रीवर छान नाव रंगवायचा व वेलबुट्ट्याही काढायचा. छत्री दुरुस्त करणारे गोसावी आता कुठे गावात फिरताना दिसत नाहीत. पूर्वी एका कुटुंबात एक दोन छत्र्या दिसत. आता व्यक्ती तितक्या प्रकृती व व्यक्ती तितक्या स्कुटर या उक्तीनुसार व्यक्ती तितक्या छत्र्या आहेत. आता पूर्वीसारखा छत्र्यांचा वापरही नाही. रेनकोटच्या जमान्यात शालेय मुले आता-आता सदासर्वदा सर्व काही लगेच मिळते. त्यामुळेच पावसाळ्याची बेगमी करण्याचा विचार कालबाह्य ठरत आहे.
------------------------------------
बाबू घाडीगावकर, जालगाव, दापोली.