रत्नागिरी : आतुरतेने वाट पहायला लावणाऱ्या पावसाने बुधवारी रात्रीपासून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक स्वरुपात बरसात करत धडाकेबाज आगमन केले. रत्नागिरी, लांजा, राजापूर या तीन तालुक्यातील ग्रामीण भागात तुफानी पाऊस झाला. लांजा आणि रत्नागिरी तालुक्यात काही ठिकाणी ओढ्यांना पूर आल्याने एस. टी.ची वाहतूक काही काळ ठप्प होण्याची घटना घडली.
रत्नागिरी आणि लांजा तालुक्यात बुधवारी दिवसभर पाऊस होता. मात्र, अन्य तालुक्यांमध्ये दिवसभर वातावरण कोरडे होते. काही ठिकाणी रात्री उशिरा पावसाने बरसायला सुरुवात केली. मात्र तो तुरळक स्वरुपात बरसत होता. रत्नागिरी शहर आणि तालुक्यात बुधवारी रात्रीपासूनच पावसाला जोरदार सुरुवात केली. मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर पहाटे साडेचार वाजल्यापासून पावसाने विजांचा लखलखाट व ढगांच्या गडगडाटासह जोरदार आगमन केले. ढगांचा गडगडाट एवढा होता की, महावितरणने वीजप्रवाह खंडित केला. अर्ध्यातासाने गडगडाट थांबल्यावर वीजप्रवाह पूर्ववत करण्यात आला. रत्नागिरीत दिवसभर पावसाची बरसात सुरुच होती.
राजापूर, लांजा तालुक्याचा ग्रामीण भाग, देवरूख, संगमेश्वर, चिपळूण, मंडणगड आदी भागातही गुरुवारी पाऊस झाला. खेड तालुक्यातील नद्या मुसळधार पावसामुळे दुथड्या भरुन वाहू लागल्या आहेत. गुहागर तालुक्यात गुरुवारी वातावरण ढगाळ होते. सकाळच्या सत्रात तुरळक पाऊस झाला. दापोली परिसरातही बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. गुरुवारी दुपारपर्यंत ग्रामीण भागात पाऊस बरसत होता.रत्नागिरी-नाटे सागरी महामार्गावर गावखडी-कशेळी दरम्यानच्या नानर करवाडी नजिकच्या मोरीवर पुराचे पाणी आल्याने आज सकाळी १० .०० वाजण्याच्या सुमारास तब्बल १ तास वहातुक खोळंबली.रस्त्यावर मोरीच्या दोन्ही बाजूंना वहानांच्या रांगा लागलेल्या दिसून येत होत्या. तर आडिवरे येथे ओढ्याला मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती.