रत्नागिरी : वाढत्या तापमानामुळे शेतकरी आधीच हवालदिल असताना अचानक हवामानात बदल होऊन पावसाळासदृश वातावरण तयार झाले आहे. वादळी वारे, पावसाचा इशारा दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
यावर्षीचा आंबा हंगाम आर्थिकदृष्ट्या संकटात आहे. पुनर्मोहोर, थ्रिप्स, तुडतुड्यामुळे आंबा पीक धोक्यात आले. मार्चपासून आंबा सुरू झाला असला तरी गतवर्षीच्या तुलनेत पीक निम्यापेक्षा कमी आहे. शिवाय दरही नसल्याने शेतकऱ्यांचा खत व्यवस्थापनापासून आंबा काढणीपर्यंत होणारा सर्व खर्च निघणे अवघड झाले आहे. गेले दोन दिवस कमाल तापमान ३४ अंश असले तरी मधूनच आभाळ दाटून येत आहे. पाऊस केव्हाही कोसळू शकतो, असे वातावरण तयार होत आहे. मात्र मध्येच वातावरण निवळत आहे. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे.
सध्या वाशी मार्केटमध्ये १००० ते २५०० रुपयांपर्यंत पेटीला दर देण्यात येत असला तरी उत्पादनासाठी एकूण येणारा खर्च जाऊन शेतकऱ्यांच्या हाती काहीच येत नसल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहे. कोकणातून ४० ते ४५ हजार, अन्य राज्यातून २५ ते ३० हजार क्रेट विक्रीसाठी येत आहेत. बदलत्या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसला असल्याने उत्पादनामध्ये कमालीची घट झाली आहे. कोकणातील आवक गतवर्षीच्या तुलनेत निम्मीच आहे. उत्पादन कमी असताना दरही घसरलेले आहेत. गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत यावर्षी पहिल्यांदाच हापूसची आवक निम्यावर झाली आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा संपला असून, दुसऱ्या टप्प्यातील आंबा किरकोळ आहे. तिसऱ्या टप्प्यातील आंब्याचे प्रमाण अत्यल्प राहणार आहे. त्यामुळे हा आंबा शेतकऱ्यांना किलोवर घालावा लागण्याची शक्यता आहे. पावसामुळे तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
..................................
हापूस उत्पादन कमी असताना दर स्थिर राहणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्याने शेतकऱ्यांना खते, कीटकनाशकांची बिले, इंधन खर्च, मजुरी इत्यादी विविध खर्च भागविणे जिकिरीचे होणार आहे. गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत यावर्षी हापूसचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. त्यातच पावसाळासदृश वातावरणामुळे शेतकरी आंबा काढण्याच्या तयारीत आहेत. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार वादळी पाऊस झाला तर शेतकऱ्यांना पुन्हा नव्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
- राजन कदम, बागायतदार, रत्नागिरी