रिफायनरीसारखे प्रकल्प कोकणात येऊ नये, अशी माझी भूमिका होती. पण सध्या परिस्थितीत इतके मोठे प्रकल्प राज्याबाहेर जाणं हे राज्याच्या आणि कोकणच्या हिताचं नाही, असं मत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून त्यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषद घेत संवाद साधला.
राज ठाकरे म्हणाले की, इथे जेव्हा रिफायनरी प्रकल्पाची घोषणा झाली तेव्हा आपल्या जमिनी प्रकल्पांसाठी कवडीमोल भावाने विकत घेतल्या हे कोकणी माणसाला कळलं. पण हजारो एकर जमिनी जेव्हा बाहेरची माणसं विकत घेत होते तेव्हा इथल्या स्थानिक माणसाला एकदाही वाटलं नाही, की ही कोण माणसं आहेत, ती जमिनी का विकत घेत आहेत? आज जमिनी हातातून निघून गेल्यावर बोलून काय उपयोग? त्यामुळे किमान यापुढे जमिनी विकताना दहावेळा विचार करा, असा सल्ला राज ठाकरे यांनी स्थानिक नागरिकांना दिला.
राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत सुरु असलेल्या विधानावरही भाष्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांकडून कोणीतही प्रेरणा घ्यायची नाही, त्यांच्याकडून काही शिकायचं नाही. फक्त वाद वाढतील हेच बघायचं हे सध्या महाराष्ट्रात सुरु आहे. त्यात पुन्हा इतिहासाबद्दल समज नसणारे पण त्या विषयांत बोलायला लागले आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.
कोकण दौऱ्यात जेंव्हा मी इथल्या नागरिकांना भेटतोय, त्यांच्याशी बोलतोय, तेंव्हा मला त्यांच्या देहबोलीत एक सकारात्मकता दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल त्यांच्या मनात असलेल्या अपेक्षा आणि विश्वास दोन्ही मला जाणवतोय. मी पुन्हा जानेवारीत येणार आहे. त्यावेळेला एक सभा कुडाळ आणि एक सभा रत्नागिरी जिल्ह्यात देणार असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
वर्षानुवर्षे कोकणाचा विकास न करणारे, साधा मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करू शकणाऱ्यांना आजपर्यंत कोकणी माणसांनी निवडून दिलं. पण आता त्यांना नाकारून एक नवा पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रूपाने उभा राहत आहे , जो कोकणाच्या विकासासाठी लढेल, असंही राज ठाकरे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितलं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"