राजापूर : मुंबई ते राजापूर असा प्रवास करणारे २८ प्रवासी वालाेपे येथे अडकून पडले हाेते. दाेन दिवस गावात अडकून पडलेल्या प्रवाशांना आमदार राजन साळवी यांनी मदतीचा हात देत त्यांच्यासाठी एस. टी. बस उपलब्ध करून दिली. त्यामुळे हे सर्व प्रवासी आपल्या घरी सुखरूप पाेहाेचू शकले.
मुंबई ते राजापूर असा प्रवास करणारे लांजा, राजापूरमधील काही प्रवासी चिपळूण शहरानजीकच्या वाशिष्ठी नदीच्या महाप्रलयात वालोपे गावी दोन दिवसांपासून अडकून पडले हाेते. यामध्ये लहान मुले व स्त्रियांसह २८ प्रवाशांचा समावेश हाेता. पूर ओसरल्यानंतरही पुढील प्रवासासाठी वाहनाची सोय होत नसल्याने त्यांना तेथेच राहावे लागले हाेते. याबाबतची माहिती गुहागर शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत यांना मिळताच त्यांनी चिपळुणात पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या आमदार राजन साळवी यांना याबाबत सांगितले. राजन साळवी यांनी महेश खानविलकर, वैभव पवार यांना सोबत घेऊन चिपळूण प्रांत कार्यालय गाठले. तेथे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा करून चिपळूण आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर संपर्क साधून त्यांनी एस. टी. बस उपलब्ध करून दिली.
चिपळूण येथे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आलेले लांजा शिवसेना शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, नगराध्यक्ष मनोहर बाईत, सचिन लिंगायत, मोहन तोडकरी यांनी प्रवाशांसाठी पाणी व बिस्किटांची सोय केली. दुपारच्या जेवणासह प्रवाशांना राजापूर, लांजाकडे मार्गस्थ करण्यात आले.