सागवे विभागाच्या शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. लक्ष्मी शिवलकरांसह शेकडो शिवसैनिक भाजपात दाखल
गोवळ ग्रामपंचयातीच्या सरपंचांसह सदस्यांचाही भाजपा प्रवेश
- सागवे विभागाच्या शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी शिवलकरांसह शिवसैनिक भाजपात दाखल
- गोवळ ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह सदस्यांचाही भाजपा प्रवेश
लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : तालुक्यातील सागवे विभागातील रिफायनरी समर्थक शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शिवसैनिकांनी पुन्हा एकदा शिवसेनेला जोरदार दणका दिला आहे. या विभागातील शिवसेनेच्या निष्ठावान महिला कार्यकर्त्या व जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी शिवलकर, सागवेचे माजी सरपंच विद्याधर राणे यांसह शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी सोमवारी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
भाजपचे प्रदेश चिटणीस व कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल गुरुमाऊलीच्या सभागृहात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रवेशकर्त्या लक्ष्मी शिवलकर यांच्यासह प्रवेशकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, तालुका सरचिटणीस अॅड. सुशांत पवार, महिला तालुकाध्यक्ष श्रुती ताम्हनकर, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष अमजद बोरकर, तालुका उपाध्यक्ष फैयाज नाटेकर, दीपक बेंद्रे, माजी नगरसेवक विलास पेडणेकर, पंढरीनाथ आंबेरकर, राजा काजवे, भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष जब्बार काझी, कणकवलीचे माजी सभापती दिलीप तळेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला गेल्या महिन्यापासून समर्थन वाढत आहे. यापूर्वी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी शिवलकर, माजी विभागप्रमुख राजा काजवे यांसह शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या प्रकल्पाचे समर्थन केले होते. त्यावर शिवसेनेने पक्षविरोधी भूमिका घेतल्याने पदाधिकाऱ्यांवर हकालपट्टीची कारवाई केली होती. मात्र, त्यानंतर शिवसेनेच्या विकास विरोधी भूमिकेला कंटाळून राजा काजवे यांच्यासह शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. याच विभागातील शिवसेनेच्या एक निष्ठावान महिला कार्यकर्त्या आणि जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी शिवलकर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विद्याधर राणे यांच्यासह कात्रादेवी, गोठीवरे, घोडेपोई, मिठगवाणे, बुरंबे, येथील रिफायनरी समर्थक शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
तसेच ज्या बारसू, सोलगाव व गोवळ परिसरात रिफायनरी प्रकल्पाची चर्चा सुरू आहे. त्या गोवळ ग्रामपंचायतीचे सरपंच अभिजित कांबळे, उपसरपंच प्रिया रोकडे आदींसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनीही विकासासाठी रिफायनरीचे समर्थन करत भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी माजी आमदार प्रमोद जठार यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत करून त्यांचा पक्षात सन्मान केला जाईल, अशी ग्वाही दिली, तर भविष्यात रिफायनरी प्रकल्प राजापुरातच होणार याचा पुनरुच्चार करत त्यांनी भविष्यात राजापूर तालुक्याच्या विकासाला गती मिळालेली असेल, असे सांगितले.
------------------------
शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या लक्ष्मी शिवलकर यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमोद जठार, अॅड. दीपक पटवर्धन, रवींद्र नागरेकर, अभिजित गुरव उपस्थित हाेते.
राजापूर तालुक्यातील गोवळ ग्रामपंचायतीचे सरपंच अभिजित कांबळे व ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.