राजापूर : ४५ वर्षांवरील नागरिकांसाठीचे लसीकरण सध्या बंद आहे. त्यातच ज्या नागरिकांनी यापूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांची मुदत संपली आहे़. त्यांनाही दुसरा डोस देण्याबाबत अद्याप कोणतीच कार्यवाही सुरू झालेली नाही. मात्र दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्यांना डोस मिळावा यासाठी राजापूर नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी पुढाकार घेतला असून, अशा नागरिकांची नोंदणी करून त्यांना लवकरात लवकर डोस मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
याबाबत अॅड. खलिफे यांनी तहसीलदार प्रतिभा वराळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निखिल परांजपे, राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री यांच्याशी चर्चा केली आहे. याबाबत खलिफे यांनी सांगितले की, ज्यांनी पहिला डोस घेतला आहे अशा ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस, मुदत संपली तरी उपलब्ध झालेला नाही. अशा लोकांची एक यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़. ज्यांनी कोव्हॅक्सिन वा ज्यांनी कोविशिल्ड या लसीचा डोस घेतला आहे, तशी लस उपलब्ध करून देण्याबाबत आरोग्य विभागासोबत नियोजन केले जाणार असल्याचे अॅड. खलिफे यांनी सांगितले. त्या - त्या लसीकरण केंद्रावरून अशा नागरिकांना डोससाठी बोलावण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे अॅड. खलिफे यांनी सांगितले.
राजापूर शहरात लवकरच प्रभागनिहाय नागरिकांच्या लसीकरणाचे नियोजन केले जाणार असल्याचे अॅड. खलिफे यांनी सांगितले.