- जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांना करावे लागतेय कामकाज
लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : सत्तेच्या माध्यमातून पदे उपभोगणाऱ्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेच्या विकासापेक्षा स्वहितच कसे साधले हे राजापूर तालुका पंचायत समितीची अखेरची घटका मोजणारी इमारत पाहिल्यावर निदर्शनास येते. या इमारतीला अखेरची घरघर लागली असून, गेले कित्येक वर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या या इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधीच उपलब्ध न झाल्याने या पावसात या इमारतीला पूर्ण गळती लागली आहे. या गळतीमुळे या इमारतीतील शिक्षण आणि ग्रामपंचायत विभागाला तलावाचे स्वरूप आले असून, महत्त्वपूर्ण अभिलेखही पावसामुळे भिजून इतिहासजमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर या गळक्या इमारतीमुळे इलेक्ट्रिकल साहित्यामध्ये पाणी गेल्याने शॉकसर्किट होऊन गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींचा कारभार ज्या पंचायत समितीच्या इमारतीतून चालतो त्या इमारतीची झालेली दुरवस्था पाहिल्यावर हाच काय विकास, असा प्रश्न केला जात आहे. राजापूर तालुका पंचायत समितीची इमारत गेली कित्येक वर्षे नादुरुस्त आहे. या इमारतीत पंचायत समितीच्या आस्थापना, लेखा विभागासह ग्रामपंचायत, शिक्षण आणि कृषी विभागाची कार्यालये आहेत, तर याच इमारतीच्या परिसरात ग्रामीण पाणीपुरवठा, आरोग्य, एकात्मिक बालविकास प्रकल्प या विभागांची कार्यालये असून, सभापती व उपसभापतींची कार्यालयेही याच आवारात आहेत.
मात्र, पंचायत समितीची मूळ इमारत गेली कित्येक वर्षे नादुरुस्त आहे. या ठिकाणी एकच इमारत बांधावी आणि सर्व कार्यालये एकाच छताखाली आणावीत असा प्रस्ताव गेली कित्येक वर्षे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते. या प्रस्तावाला मुहूर्त स्वरूप आजतागायत आलेले नाही, तर पंचायत समितीच्या या नादुरुस्त इमारतीच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद व शासनाकडे वारंवार निधी मागूनही तो उपलब्ध झालेला नाही. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी सुमारे २५ ते ३० लाखांच्या निधीची आवश्यकता आहे. इमारत पूर्णपणे नादुरुस्त झाली असून कधीही पडण्याच्या अवस्थेत आहे. मात्र, जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता आणि तालुका पंचायत समितीत शिवसेनेचीच सत्ता असूनही इमारत दुरुस्तीसाठी निधीच उपलब्ध होत नाही अशी अवस्था आहे. पंचायत समितीच्या अख्यत्यारित येणाऱ्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या इमारती दुरुस्तीसाठी गतवर्षी २० लाखांचा निधी उपलब्ध झाला; पण पंचायत समितीच्या मुख्य इमारतीसाठी नाही अशी सध्या अवस्था आहे.
या मुख्य इमारतीतील शिक्षण आणि ग्रामपंचायत विभागाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. पूर्णपणे छप्पर मोडकळीस आल्याने पावसात गळती लागली असून, तलावाचे स्वरूप आले आहे, तर शिक्षण व ग्रामपंचायत विभागातील महत्त्वपूर्ण अभिलेखही या पावसात भिजत आहे. तर लेखा विभागातही तीच अवस्था आहे. गटविकास अधिकाऱ्यांचे दालन मात्र टकाटक आहे. कारण त्यावर दोनच वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. मात्र पंचायत समितीच्या मुख्य इमारतीला लागलेली गळती आणि भिजणारा अभिलेख याबाबत कुणीही बोलत नाही, अशी अवस्था आहे.
-----------------------
हाच काय विकास?
तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासाचे नियोजन ज्या इमारतीतून केले जाते, त्या इमारतीची दुरवस्था पाहिल्यावर हाच काय विकास, असा अनेकांना प्रश्न पडतो. आज ग्रामीण भागात रस्ते वाहून जात आहेत. पाखाड्या पडत आहेत, संरक्षक भिंतीही ढासळत आहेत, त्यामुळे या कामांच्या दर्जाबाबतही आता प्रश्न उपस्थित केला जात आहे.