राजापूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनादेश मिळाला असला तरी सत्ता स्थापनेवरून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. ज्या मुद्द्यांवर या दोन पक्षांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये रिफायनरी प्रकल्पाचादेखील विषय असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प पुन्हा एकदा अस्थिरतेच्या भोवऱ्यात सापडला आहे.
तालुक्यातील नाणार परिसरात मागील दोन वर्षांहून अधिक काळ जोरदार संघर्ष पाहायला मिळाला होता. स्थानिक पातळीपासून देश पातळीवर विविध प्रकारची आंदोलने झाली होती. भाजपवगळता अनेक पक्षांनी रिफायनरीला कडाडून विरोध केल्यामुळे राजकीय संघर्षही झाला होता. यामध्ये सत्ताधारी व विरोधक यांच्यात जसा संघर्ष झाला तसाच तो केंद्र व राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजप, शिवसेनेतदेखील झाला होता.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असहाय बनलेल्या भाजपला केंद्रात पुन्हा सत्ता आणण्यासाठी शिवसेनेशी जुळवून घेताना रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द करावी लागली होती. मात्र, केंद्रात मतदारांचा जबरदस्त कौल मिळत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते.त्यामुळे रिफायनरी प्रकल्प नाणारमधून बाहेर जाणार नाही, अशी आशा प्रकल्प समर्थकांना वाटत असतानाच निवडणुकीच्या पूर्वी महाजनादेश यात्रेनिमित्त राजापुरात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिफायनरी प्रकल्प समर्थकांचा उत्साह पाहता पुन्हा चर्चा करावीशी वाटते.
आपण चर्चेसाठी पुन्हा येऊ, असे सूचक विधान करुन नव्याने वादाला खमंग फोडणी दिली होती. त्याचे प्रकल्प परिसरात जोरदार पडसाद उमटले होते. केंद्र व राज्यातील सत्तेतील सहकारी पक्ष शिवसेना जोरदार आक्रमक झाली होती. कोकणचा नाश करणारा विनाशकारी प्रकल्प पुन्हा येऊ देणार नाही, अशा गर्जना सेनानेत्यांकडून करण्यात आल्या. त्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले आहेत. राज्यातील मतदारांनी पुन्हा महायुतीला जनाधार दिला आहे. सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून भाजप पुढे आला असला तरी त्या पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेशी जुळवून घेणे भाजपला क्रमप्राप्त आहे.
निवडणूक निकालानंतर शिवसेना, भाजपमध्ये समान सत्तेचा वाटा यावरुन विविध मते व्यक्त होऊ लागली आहेत. अन्य काही मुद्द्यांवरदेखील दोन्ही पक्षात मतभेद आहेत. त्यामध्ये रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दाही आहे.दोन्ही पक्षांसाठी हा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे भाजपला महायुतीतून पुन्हा राज्यात सत्ता स्थापन करायची असेल तर शिवसेनेकडून रिफायनरीच्या प्रश्नावर भाजपला कोंडीत पकडले जाईल व शिवसेना आपली वाघनखे बाहेर काढून रिफायनरी प्रकल्पाला कडाडून विरोध करताना तो प्रकल्प पुन्हा येऊ नये म्हणून प्रयत्न करणार हे निश्चित आहे. आता भाजप आता प्रकल्पाबाबत कोणती भूमिका घेणार, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.शिवसेना कोंडी करणार?राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेने सातत्याने विरोध केला आहे. या विरोधामुळेच त्या भागातील जनता शिवसेनेच्या पाठिशी राहिल्याचे दिसून आले आहे.विधानसभा निवडणुकीच्या आधी रिफायनरीवरून उठलेले वादळ शिवसेना आणि भाजप यांच्यात वादाचे कारण ठरले होते. रिफायनरी समर्थनार्थ भाजपची भूमिका, तर शिवसेनेची विरोधाची भूमिका यामुळे दोन्ही पक्षांमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते.हाच मुद्दा सत्ता स्थापनेच्या वेळी पुढे येण्याची चिन्ह असून, शिवसेना या मुद्द्यावरून भाजपला कोंडीत पकडू शकते.