राजापूर : राजापूर शहर आणि तालुका परिसरात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने ग्रामीण भागाला जोरदार तडाखा बसला आहे. ग्रामीण भागातील अनेक रस्ते, पूल, साकव, पायवाटा या अतिवृष्टीत वाहून गेल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गाव आणि वाडी-वस्तीवरील संपर्क तुटला असून, सर्वसामान्य जनतेची आता मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे विकासाच्या पोकळ गप्पा मारणाऱ्या आणि आजपर्यंत केवळ पाखाड्या आणि सरंक्षण भिंती हाच विकास यात अडकून पडलेल्या शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या सुविधा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
दरवर्षीच अतिवृष्टीत वाहून जाणारे रस्ते, पूल, साकव आणि पायवाटा पाहिल्यावर या कामांच्या दर्जाबाबतही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी केल्या जाणाऱ्या या कामांचा दर्जा चांगला नसल्यानेच आज ग्रामीण भागातील जनतेच्या पदरी अशी उपेक्षा येत असल्याचेही यातून उघड झाले आहे. अर्जुना आणि जामदा नदीच्या पुराच्या पाण्यात या भागातील अनेक रस्ते, साकव वाहून गेले आहेत. तालुक्यातील पाचल-तळवडे रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे; तर राजापूर, हर्डी, रानतळे, धारतळे मार्ग सुमारे पाच ते सात फूट खचला आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. ओणी - शिवणे, पाचल - काजिर्डा, डोंगर - जैतापूर या मार्गावर दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. या ठिकाणी भविष्यात संरक्षण भिंती बांधणे आवश्यक आहे; तर रायपाटण-बागवेवाडी, मिळंद-हातदे, सावडाव-नेर्ले मार्गावर नदीवरील साकव या पुरात वाहून गेल्याने या भागातील जनतेचा संपर्क तुटला आहे.
राजापूर, शीळ, गोठणेदोनिवडे चिखलगाव रस्ता तर गेली दहा ते बारा दिवस पाण्याखाली होता. त्यामुळे या भागातील जनतेला यावर्षीही यातायात सहन करावी लागली आहे. अनेक भागात पाखाड्या, संरक्षण भिंती ढासळल्या आहेत. राजापूर-ओणी-पाचल-अणुस्कुरा मार्गावरील दरडी काढणे, रस्ता डांबरीकरण करणे, रूंदीकरण करणे यासाठी कोटयवधी रुपये खर्चूनही या पावसाळ्यात या घाटात पाच ते सहा ठिकाणी दरडी कोसळल्या व हा मार्ग वाहतुकीला बंद झाला होता. मात्र या ठिकाणी कोसळणाऱ्या दरडींवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
--------------------------
दुरूस्तीसाठी हवेत ३११ काेटी
सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित अनेक रस्ते, साकव व पुलांची हानी झाली आहे. जिल्हा परिषद बांधकाम उपविभागअंतर्गत ८१ रस्ते, १० साकव आणि कॉजवे, तर दोन शासकीय इमारती यामध्ये बाधित झाल्या आहेत. त्यासाठी ३११ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.