राजापूर : ताैक्ते चक्रीवादळामुळे राजापूर तालुक्याला मोठा तडाखा बसला होता. या वादळामुळे सुमारे दोन कोटींच्या आसपास नुकसान झाले असून, तालुका प्रशासनाकडून तेवढ्या रकमेची मागणी शासन स्तरावर करण्यात आली आहे.
या चक्रीवादळामुळे घरांचे, गोठ्यांचे, मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासकीय पातळीवरुन पंचनामे करण्यात आले असून, चक्रीवादळात जवळपास दोन कोटींच्या आसपास आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. येथील प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार एकूण २,३५५ लाभार्थी आहेत तर वादळात किरकोळ जखमी झालेले लाभार्थी तीन, बाधित कुटुंबांना कपडे व घरगुती वस्तूंसाठी सानुग्रह सहाय्य यासाठी असलेले लाभार्थी सहा, पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांची पडझड झालेले सहा लाभार्थी, पडझड (किमान १५ टक्के ) नुकसान झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांसाठी मदत हवी असलेले ४६८ लाभार्थी आहेत.
निराधार झालेल्या कुटुंबांना मोफत अन्न, धान्य व केरोसीनसाठी आवश्यक अनुदानाचे लाभार्थी सहा, जनावरांच्या गोठ्यांच्या नुकसानासाठी मदतीचे लाभार्थी ४८, मत्स्य व्यावसायिकांच्या नुकसानासाठी मदत, बोटी व जाळी यांचे लाभार्थी ४०़, ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीविषयक बाधित क्षेत्रांची सारांश माहितीचे लाभार्थी १,७७८ असे एकूण २,३५५ लाभार्थी आहेत.