राजापूर : शाळाबाह्य अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या निर्देशाप्रमाणे गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम राबविली होती. त्यामध्ये शाळेमध्ये अनियमित आणि एक महिन्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असलेली तीन मुले आढळली. त्यांना लगतच्या शाळेमध्ये दाखल करून त्यांना पुन्हा एकदा शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्यात आले आहे.
समाजातील शिक्षणाचा टक्का वाढविताना साऱ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने शासनाने सक्तीचे शिक्षण कायदा संमत केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याने अनेकांना शिक्षणाची द्वारे खुली झाली आहेत. मात्र, तरीही अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहिली आहेत. त्यामध्ये रोजगारानिमित्ताने राज्यात आलेल्या परप्रांतीय कुटुंबातील मुलांचा समावेश आहे. शिक्षण विभागाने यापूर्वी राबविलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणामध्ये परप्रांतीय कुटुंबातील अनेक मुलांना शाळांमध्ये दाखल करून त्यांना शैक्षणिक प्रवाहामध्ये आणले आहे. त्याप्रमाणे शासन निर्देशाप्रमाणे शिक्षण विभागाकडून नव्याने गत महिन्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यामध्ये आढळणाऱ्या शाळाबाह्य मुलांना शाळेमध्ये दाखल करण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे.
तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या तालुकास्तरीय समितीच्या नेतृत्व आणि भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या शोध मोहिमेमध्ये तालुक्यातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, पंचायत समितीतील विशेष शिक्षक आदी सहभागी झाले होते. या माेहिमेत ३६,६७७ कुटुंबातील २५,५८४ बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये शाळेत न गेलेले एकही मूल आढळले नसून शाळेमध्ये अनियमित आणि एक महिन्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असलेली तीन मुले आढळली. त्यांना लगतच्या शाळांमध्ये दाखल करण्यात आले.