राजापूर : एकीकडे तालुक्यात सर्वत्र धुवाधार पाऊस सुरु असताना दुसरीकडे पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत असल्यामुळे शहरातील वरचीपेठ तेली वठार भागातील नागरिकांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी राजापूर नगरपरिषदेवर हंडा मोर्र्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात हा पाणी प्रश्न उग्र रुप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गेला महिनाभर संपूर्ण वरची पेठ परिसराला नगर परिषदेतर्फे केला जाणारा पाणीपुरवठा सुरळीत होत नसून, अतिशय कमी दाबाने पाणी सोडले जात असल्यामुळे येथील नागरिकांना जेमतेम दोन ते तीन हंडे पाणी मिळते. संपूर्ण परिसरातील कुटुंबांची हीच समस्या असून, येथील नागरिकांनी ही बाब नगरपरिषदेच्या निदर्शनास आणूनदेखील निर्माण झालेली समस्या अद्याप प्रशासनाला दूर करता आलेली नाही. मागील तीन महिने समाधानकारक पाऊस पडत असूनदेखील वरचीपेठ भागातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथील नागरिक संतप्त झाले आहेत. हंडा मोर्चाव्दारे नगर परिषदेवर धडक देण्याची तयारी सुरु झाली आहे. मध्यंतरीच्या काळात राजापूर नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून शीळ जॅकवेलवर मोबाईल रिमोट सेन्सरप्रणाली सुरु केली असून, या प्रणालीव्दारे शीळ जॅकवेलवरून पाणी खेचणे सोयीचे झाले आहे. या प्रणालीमुळे राजापूर नगरपरिषदेचा कर्मचारीवर्गावर होणारा खर्चही वाचणार आहे. त्यामुळे हेच मनुष्यबळ नगर परिषद पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी वापरु शकणार आहे. मात्र, सद्यस्थितीत शहरातील अनेक भागात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची मनमानी सुरु असून, अनेकवेळा सांगूनही हे कर्मचारी योग्य दाबाने पाणी सोडत नसल्याची तक्रार नागरिकांनी लोकमतशी बोलताना केली. कर्मचाऱ्यांच्या या मनमानीमुळेच शहरातील अनेक नागरिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नसून, अतिशय कमी दाबाने पाणी सोडले जात आहे. यामुळे शहरवासीयांना ऐन पावसाळ्यात पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. याबाबत येथील नागरिकांनी भागातील नगरसेवकांना व नगर परिषद प्रशासनाला वेळोवेळी माहिती दिली आहे. मात्र, या समस्येकडे येथील स्थानिक नगरसेवक व नगर परिषद प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. येत्या आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी प्रश्न उग्र रुप धारण करण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
राजापूर--भर पावसात राजापुरात पाणीटंचाइ
By admin | Published: September 01, 2014 10:45 PM