राजापूर : केंद्रातील भाजपा सरकारने शेतकरी विरोधी कृषी विधेयक आणून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. याच्या निषेधार्थ राजापूर तालुका युवक काँग्रेसतर्फे या विधेयकाची शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.युवक काँग्रेसचे मंदार सप्रे यांच्या नेतृत्वाखाली राजापूर तालुका युवक काँग्रेसने शेतकऱ्यांच्या उपस्थितीत या विधेयकाची होळी करण्यात आली. या विधेयकामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे.
बाजार समित्या बंद केल्यास मोठ्या कंपन्यांच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना मोबदला मिळेल. अशा वेळी कंपन्या आपल्या गरजेनुसार मालाच्या किंमती ठरवू शकतात. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे.
अत्यावश्यक वस्तू कायद्यातील दुरुस्तीमुळे व्यापारी गरजेपेक्षाही जास्त प्रमाणात मालाचा साठा करु शकतात. त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही. या साठेबाजीमुळे सामान्य नागरिकांना महागाईची झळ बसेल, असे मंदार सप्रे यांनी म्हटले आहे.या समस्या असल्यामुळे या विधेयकाचा काँग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी युवा नेते संजय कपाळे, बबन राठवड, प्रकाश गराठे, प्रकाश आरावकर, बंडू कानडे, मनोहर आडिवरेकर, अमोल आडिवरेकर, अनिल नाफडे उपस्थित होते.