राजापूर : शहरातील खपडेवाडी येथील रहिवासी, उत्कृष्ट क्रिकेटपटू व रिक्षा व्यावसायिक प्रशांत पांडुरंग उर्फ गाेट्या खडपे (४४) यांचे रविवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने कुंभवडे (ता. राजापूर) येथे आकस्मिक निधन झाले. राजापूर नगर परिषदेतील शिवसेनेच्या नगरसेविका प्रतीक्षा खडपे यांचे ते पती होत तर कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यांचे ते मेहुणे होत.
शहरातील खडपेवाडीतील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आणि एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून ते परिचित होते. हनुमान प्रसन्न खडपेवाडी क्रिकेट संघाचे ते जनक होते. गोट्या खडपे या टोपण नावाने ते सर्वत्र परिचित होते. ते राजापूर खडपेवाडी व कुंभवडे येथे पंढरीनाथ आंबेरकर यांच्या निवासस्थानी येऊन-जाऊन राहत असत. शनिवारी ते पत्नी प्रतीक्षा यांसह कुंभवडे मुक्कामी गेले होते. रविवारी दुपारी अचानक त्यांना चक्कर आल्याने ते पडले. त्यांना तत्काळ कुंभवडे प्राथमिक ओरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र, रविवारी मध्यरात्री अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. पंढरीनाथ आंबेरकर यांनी रुग्णवाहिका मागवून त्यांना दवाखान्यात नेण्याची तयारी केली. मात्र, तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्यावर सोमवारी सकाळी कुंभवडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.