लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : ४५ वर्ष व त्यापुढील वयोगटातील नागरिकांच्या दुसऱ्या डोसची तारीख उलटून गेली तरी प्राधान्याने दुसरा डोस देण्याचे नियाेजन करण्यात आलेले नाही़. शासनाने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देणे सुरू केल्याने दुसऱ्या डोसपासून वंचित राहिलेल्या नागरिकांनी शुक्रवारी राजापूर हायस्कूल येथे लसीकरण केंद्रावर गर्दी करत प्रशासनाला जाब विचारला. शासनाने पुढील आठवड्यात आम्हाला कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध करून न दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशाराच राजापुरातील नागरिकांनी दिला आहे.
राजापूर शहर आणि तालुका परिसरातील अनेक नागरिकांनी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे. मात्र, त्यांची दुसऱ्या डोसची तारीख उलटून गेली तरी दुसरा डोस उपलब्ध होत नसल्याने शुक्रवारी या नागरिकांनी राजापूर हायस्कूल येथील लसीकरण केंद्रावर धडक दिली. माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी, माजी नगरसेविका शीतल पटेल, मधुकर पवार, विलास चव्हाण, शैलेंद्र संसारे, नीलेश रहाटे, विनायक मेस्त्री, आदींसह काही ज्येष्ठ नागरिकांनी याठिकाणी उपस्थित राहात दुसरा डोस देण्याची मागणी केली. मात्र, ऑनलाईन शेड्युलमध्ये ४५ वर्षावरील वयोगटासाठी लस उपलब्ध नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर आम्ही याठिकाणी दररोज येऊन रांगा लावत आहोत. मात्र, दरदिवशी लस नसल्याचे सांगून आम्हाला परत पाठवले जात असल्याचा आरोप यावेळी या नागरिकांनी केला. प्रशासन स्तरावर या लसीकरणाबाबत स्पष्ट धोरण नसल्याचे म्हणणे नागरिकांनी मांडले. नागरिकांनी लसीकरणाविषयीच्या ढिसाळ नियोजनाबाबत निषेध नोंदविला.
नागरिकांचा उद्रेक हाेत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर तेथे हजर झाले. त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले व ४५ वर्षावरील दुसऱ्या डोसपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना डोस उपलब्ध होण्याबाबत जिल्हाधिकारी स्तरावर विचारणा करण्याचे आश्वासन दिल्यावर या नागरिकांनी लसीकरण केंद्र सोडले.
शासनाने ४५ वर्षावरील नागरिकांना प्राधान्याने दुसरा डोस अथवा प्रथम डोस देणे आवश्यक असताना, या वयोगटातील लसीकरण पूर्णपणे थांबविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करत, दुसरा टप्पा सुरू करताना शासनाने ज्येष्ठ नागरिकांची परवड केल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
कारभाराबाबत नाराजीचा सूर
४५ ते पुढील वयोगटासाठी प्राधान्याने लसीकरण करणे आवश्यक असताना त्यांच्यासाठीची ऑनलाईन नोंदीची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे तर १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण खुले केल्याने प्रशासनाच्या अनागोंदी नियोजनाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.