राजापूर : राजापूरची ग्रामदेवता श्रीनिनादेवीच्या मानकऱ्यांच्या सभेत यंदा शिमगोत्सव अत्यंत साधेपणाने व शासनाच्या आदेशाप्रमाणे साजरा करण्याचे ठरवण्यात आले. कोविडचा उद्रेक आपल्या शहरात व आजूबाजूला होणार नाही याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. शहरातील प्रमुख होळी असलेल्या ग्रामदेवता निनादेवीची राजहोळी सालाबादप्रमाणे जवाहर चौक येथे न नेता निनादेवी मंदिर येथून परीट घाटीने मांडावर उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी ही होळी पाहण्यासाठी शहर व तालुक्यातून हजारो लोकांची उपस्थित राहतात.
यंदा राजहोळीच्या उत्सवात वाद्ये वाजविण्यात येणार नसून, होळी खेळविली जाणार नाही. पौर्णिमेचा होम अत्यंत छोट्या स्वरूपात, कमी लोकांत करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशीची मुलांची होळीही साधेपणाने कन्या शाळेजवळील मांडावर उभी करण्यात येईल. रोंबट रात्री आठ वाजता वरच्या पेठेमधून निघून दहापूर्वी मांडावर येईल. यावेळी ठरावीकच मंडळी उपस्थित असतील.
रंगपंचमी आठ ते दहा माणसांच्या उपस्थितीत महापुरुषाला रंग लावून वरची पेठ, जवाहर चौक मार्गे सायंकाळी सहापूर्वी होळीच्या मांडावर येईल. यामध्ये रंग उडविला जाणार नाही. सायंकाळी साडेसहा वाजता मांडावरून देवी निनादेवी मंदिरात येईल व शिमगोत्सवाची सांगता येईल. देवीचे निशाण दोन- तीन माणसांत घरोघरी जाईल. यावेळीही वाद्य वाजविले जाणार नाही. या बैठकीला मंडळाचे विश्वस्त नंदकुमार चव्हाण, प्रकाश चव्हाण, प्रभाकर चव्हाण, बाळ करंगुटकर, नंदकिशोर चव्हाण, देवीचे पुजारी दीपक गुरव आदी उपस्थित होते.