विनोद पवार
राजापूर : कोणताही व्यवसाय असो तो करण्याची जिद्द, कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा व सचोटीची जोड मिळाली तर तो यशस्वी होऊ शकतो, हे राजापूर तालुक्यातील डोंगर येथील साखरकर बंधूंच्या बेकरी व्यवसाय ते शाही पराठा उद्योगाच्या यशस्वी वाटचालीकडे पाहिल्यावर लक्षात येते.शाही पराठयाच्या माध्यमातुन मैदा, गहू, मेथी असे तीन प्रकारचे पराठा तसेच पुरी आणि पुरणपोळीच्या उत्पादनातुन साखरकर बंधूंनी राजापूरचे आणि डोंगर गावचे नाव संपुर्ण महाराष्ट्राबरोबरच गुजराथ, कर्नाटक आणि गोव्या पर्यंत पोहचविले आहे. त्यामुळे साखरकरांच्या शाही पराठयाचा डंका महाराष्ट्राबाहेरा बाहेरही होत आहे.तर साखरकरांच्या या पराठयाची भुरळ परदेशात राहणाऱ्यांनाही पडली असून अनेक जण जिथे मिळेल तेथून हे शाही पराठे, पुरी आणि पुरणपोळी परदेशात घेऊन जात आहेत. त्यामुळे साखरकरांच्या शाही पराठयाने सातासमुद्रापार धडक दिली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आता लवकरच साखरकर बंधू या शाही पराठयाच्या माध्यमातुन मलबार लच्चा पराठयाचे उत्पादन करणार आहेत. त्यामुळे साखरकरांच्या शाही पराठयाची चव चाखणाऱ्यांना आता या नव्या मलबार लच्चा पराठयाची चव चाखता येणार आहे.साखरकर बंधुंच्या या शाही पराठयाच्या उत्पादनामुळे राजापूरची आणखी एक नवी ओळख उद्योग व्यवसायत निर्माण होत आहे. या व्यवसायाच्या माध्यमातुन साखरकर यांनी डोंगर, गोवळ, विल्ये भागातील ३० महिलांसह दोन पुरूष अशा ३२ जणांना प्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध करून दिला असून दररोज सुमारे अडीच टन इतके या वस्तुंचे उत्पादन होत आहे. आता साखरकरांची तिसरी पीढीही या व्यवसाय काम करत असून साखरकर परिवाराचे सिराज साखरकर व शरफुद्दीन साखरकर या दोन बंधूंबरोबर सिराज साखरकर यांचे सुपुत्र नवीन साखरकर हे या व्यवसायाची धुरा सांभाळत आहेत. १९९८-९९ साली बेकरी उत्पादनाला सुरूवात डोंगर गावचे साखरकर कुटुंबीय हे एक हे एक सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे कुटुंबीय आहे. सन १९९८-९९ साली साखरकर यांनी साखरकर बेकर्स या नावाने बेकरी उत्पादनाला सुरूवात केली. मात्र राजापूर शहर आणि तालुका परिसरात वेगळं काहीतरी करण्याची जिद्द असलेल्या आणि ध्यास घेतलेल्या साखरकर बंधूंनी दहा वर्षापुर्वी बेकरी व्यवसायातुन या पराठा व्यवसायात पदार्पण केले.परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध या व्यवसायाच्या माध्यमातुन साखरकर यांनी या परिसरातील ३० महिला व दोन पुरूष अशा ३२ जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अगदी यंत्राद्वारे पिठ मळण्यापासून ते पॅकिंग आणि आर्डर पाठविण्यापर्यंत सर्व कामे या महिला करत आहेत. कोरोना काळात लॉकडाऊमध्येही चांगल्या प्रकारे उत्पादन व विक्री सुरू होती. ग्रामीण भागातील गरजू महिलांना या व्यवसायाच्या माध्यमातुन आर्थिक शक्ती मिळाली आहे.