देवरुख : नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस गाडीला संगमेश्वर रेल्वे स्थानकात थांबा मिळावा, यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. म्हणूनच निसर्गरम्य संगमेश्वर - चिपळूण या फेसबुक ग्रुपने १ मे राेजी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. काेरोनाचे नियम पाळून हे उपोषण करण्यात येईल, असे ग्रुपचे प्रमुख संदेश झिमण यांनी स्पष्ट केले आहे.
नेत्रावती (अप - डाऊन) आणि मत्स्यगंधा (अप - डाऊन) एक्स्प्रेसला संगमेश्वर स्थानकात थांबा मिळावा, यासाठी या ग्रुपतर्फे १९ नोव्हेंबर २०१९ रोजी पहिले पत्र रत्नागिरीतील कोकण रेल्वे कार्यालयात दिले होते. त्यावर कोकण रेल्वेने पाठविलेले उत्तर पटण्याजोगे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर ५ फेब्रुवारी २०२० रोजी रत्नागिरी येथील कोकण रेल्वे कार्यालयात पुन्हा पत्र देण्यात आले. त्यावर महिनाभरात उत्तर येणे अपेक्षित असताना तसे झाले नाही. या पत्राचे उत्तर पाठविल्याचा दावा कोकण रेल्वे प्रशासनाने केला असला तरी तसे पत्र आम्हाला पोस्टाने किंवा कुरिअरने मिळेलेले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. ग्रुपचे सदस्य जानेवारी २०२१मध्ये कोकण रेल्वेच्या रत्नागिरी कार्यालयात गेले असताना त्या पत्राची प्रत देण्यात आली. त्यानंतर अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही रेल्वे प्रशासनाकडून त्या पत्रांना केराची टाेपली दाखविण्यात आल्याचे म्हटले आहे.
कोकण रेल्वे प्रशासन वेळकाढूपणा करत आहे, असा आरोपही केला आहे. आमच्या प्रश्नांची, मागण्यांची दखलही घेतलेली नसल्याने १ मे रोजी संगमेश्वर रेल्वे स्थानक परिसरात मोजके कार्यकर्ते, भूमिपुत्र, कोकण रेल्वे प्रवासी उपोषण करणार आहेत. रेल्वे शासनाच्या टोलवाटोलवीच्या धोरणामुळेच अखेरीस आंदोलनाचे अस्त्र हाती घ्यावे लागले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.